पावसाने केली शेतकऱ्यांची निराशा, सप्टेंबरकडून अपेक्षा !
गोंदिया ◼️ गत काही वर्षापासून हंगामाच्या सुरवातीला पावसाचा लहरीपणा सातत्याने जाणवत आहे. यंदाही जूनमध्ये मोसमी पाऊसाने हुलकावणी दिली. यानंतर जुलैमध्ये पावसाने सरासरी गाठल्याने धान रोवणीच्या कामाला गती मिळाली. ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊस बरसला नाही. परिणामी जिल्ह्यातील काही भागात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. ऑगस्ट कोरडा गेल्यानंतर सप्टेंबरकडून शेतकरी, जनता आशा बाळगून आहेत.
यंदाच्या हंगामाची सुरवात तशी रडखडतच झाली. जिल्ह्यात पुर्व मोसमी पाऊस बरसलाच नाही. 24 जूननंतर जिल्ह्यात मोसमी पावसाने हजेरी लावली. या पावसातच शेतकर्यांनी धान नर्सरी टाकल्या. अधूनमधून पाऊस बरसत राहिल्याने नर्सरींची वाढही बर्यापैकी झाली. यानंतर जुलैच्या पंधरवाड्यात जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊस झाला. जून महिन्याची भरपाई जुलैमध्ये झाली. या महिन्यात सरासरीच्या 107 टक्के पाऊस झाला. ऑगस्टने मात्र गोंदियाकरांची घोर निराशा केली. आता सर्वांना सप्टेंबरकडून मोठी अपेक्षा आहे.जिल्ह्यात 1 जून ते 31 ऑगस्ट या कालावधीत 1021.6 मिमी पाऊस होणे अपेक्षित असताना 816.3 मिमीच झाला.rain टक्केवारीचा विचार केल्यास 79.9 टक्के आहे. अर्थातच जिल्ह्यात 20.1 टक्के पावसाची तूट आहे. जिल्ह्यात पावसाचा थेंबही कोसळत नसल्याने उकाडा चांगलाच वाढला आहे. अनेक आजारांसाठी हे वातावरण पोषक असल्याने अनेक साथजन्य आजारांनी डोके वर काढल्याचे चित्र आहे.
परतीच्या पावसावर भिस्त
जिल्ह्यात सरासरीच्या सर्वाधिक पाऊस जुलैमध्ये कोसळतो. साधारणतः 17 सप्टेंबरपासून राजस्थानातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो. महाराष्ट्रातून ऑक्टोबरमध्ये माघारतो. त्यामुळे 8 सप्टेंबरनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात येत आहे. परतीच्या पावसाने योग्य टक्केवारी गाठली नाही तर पीक नष्ट होऊन पाण्याची समस्या गंभीर होऊ शकते. त्यामुळे आता सगळी भिस्त परतीच्या पावसावर अवलंबून आहे.
पावसाचा जिल्हा म्हणून गोंदियाची ओळख आहे. गोंदियात पावसाळ्याच्या कालावधीत 1221 मिमी पाऊस होतो. गत दशक भराच्या काळात गतवर्षीच सरासरीच्या 132 टक्के म्हणजेच 1364.5 मिमी पाऊस बरसला. 1 जून ते 31 ऑगस्ट या कालावधीत 205.3 मिमी पावसाची तूट आहे. आतापर्यंत गोंदिया तालुक्यात 83.4 टक्के, तिरोडा 72.6, आमगाव 59, गोरेगाव 82.2, सालेकसा 87.9, देवरी 82.9, अर्जुनी मोरगाव 82.4, सडक अर्जुनी तालुक्यात 75.1 टक्के असा एकूण 79.9 टक्के पाऊस झाला आहे. आमगाव तालुक्यात सर्वात कमी पावसाची नोंद असून ठाणा व आमगाव या महसूल मंडळात अनुक्रमे 53, 58 टक्केच पाऊस झाला आहे. तिरोडा मंडळात 57.7 टक्केच पाऊस बरसला आहे.