
जिल्हातील ६० हजार विद्यार्थी १० दिवसापासून शाळेत उपाशी !
तांदळाचा पुरवठा न झाल्याने उपाशीपोटी विद्यार्थ्यांना धडे
प्रहार टाईम्स वृत्तसंकलन
गोंदिया : इयत्ता१ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. मात्र जि.प. व खासगी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या ६० हजारांवर विद्यार्थ्यांना गेल्या १० दिवसांपासून पोषण आहार दिला जात नसल्याचा प्रकार गोंदिया जिल्हात पुढे आला आहे. शासनाने नियुक्त केलेल्या पुरवठादाराने शाळांना तांदूळ व इतर साहित्याचा पुरवठा न केल्याने ही वेळ आल्याची माहिती समोर आली आहे.यावरून गोंदिया जिल्हातील सबंधित विभागातील अधिकाऱ्यांची कार्यप्रणाली आणि तत्परतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे?
इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत आठवडाभर दिल्या जाणाऱ्या पोषण आहारासाठी आता शिक्षण विभागाकडून मेन्यूचे प्रकार ठरवून देण्यात आले आहे. प्रत्येक दिवसाचे मेन्यू कार्ड शिक्षक आणि मुख्याध्यापकांना दिले आहे. यातून विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळत असला तरीही निधीअभावी शिक्षकांनाच पदरमोड करावी लागत आहे. यासोबतच त्याचा हिशेब ठेवताना ही त्रास सहन करावा लागत आहे . विद्यार्थ्यांना पोषण आहारात सतत खिचडी दिली जात असल्याने आता आहारात वैविधता आणण्यासाठी विविध पाककृतींचा समावेश केला आहे. या पोषण आहारानुसार विद्यार्थ्यांना महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील मंगळवारी हरभऱ्याचे उसळ व भात आणि दुसऱ्या आठवड्यातील मंगळवारी त्यात बदल केला जातो. परंतु शाळांना कंत्राटदाराकडून त्या वस्तूंचा वेळेत पुरवठाच होत नाही. परिणामी विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारापासून वंचित राहावे लागत आहे. जिल्ह्यात इयत्ता १ ते ८ वीपर्यंत शिक्षण घेणारे १ लाख विद्यार्थी आहे. सध्या शाळा सकाळ पाळीत सुरु आहे. त्यामुळे विद्यार्थी सकाळी ७ ते ११ या कालावधी शाळेत असतात. सकाळची शाळा असल्याने बरेच विद्यार्थी शाळेत पोषण आहार मिळत असल्याने घरुन उपाशी येतात. मात्र गेल्या दहा दिवसांपासून शाळांमध्ये पोषण आहार मिळणे बंद असल्याने विद्यार्थ्यांना उपाशीपोटीच धडे घ्यावे लागत आहे. शाळांचा पोषण आहार तयार करण्यासाठी अन्नधान्याचा पुरवठा करण्याची मागणी शाळांकडून करण्यात आली. पण अद्यापही शाळांना अन्नधान्याचा पुरवठा न झाल्याने जवळपास ६० हजारांवर विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित आहे.
शासनाने पोषण आहाराचा पुरवठा करण्यासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदाराने शाळांना गेल्या दहा दिवसांपासून तांदूळ आणि इतर साहित्यांचा पुरवठा न केल्याने शाळांमध्ये पोषण आहार तयार करणे बंद झाले आहे. परिणामी विद्यार्थ्यांना पोषण आहारापासून वंचित राहावे लागले . कंत्राटदाराकडून तांदूळ व इतर साहित्याचा पुरवठा करण्यास विलंब झाल्याने पोषण आहार तयार करण्याची अडचण निर्माण झाली. याची सूचना संबंधितांना केली असून तीन चार दिवसात सर्व शाळांना पोषण आहाराचा पुरवठा होऊन विद्यार्थ्यांना नियमित पोषण आहार मिळेल. पुरवठ्याची अडचण आता दूर झाली आहे.असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिली.
जिल्ह्यासाठी लागतो ३०० मेट्रिक टन तांदूळ
जिल्ह्यात जि.प. व खासगी अशा एकूण १६६९ शाळा असून यात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणारे एकूण १ लाख विद्यार्थी आहे. या विद्यार्थ्यांना वर्षभर पोषण आहारासाठी ३०० मेट्रिक टन तांदूळ लागतो. तांदळासह पोषण आहारासाठी लागणारे साहित्य कंत्राटदारामार्फत पुरविले जाते.