पुराडा-लोहारा गावांना अघोषित भारनियमनाचा फटका, शेतकरी आणि जनसामान्याचे बेहाल

◼️दिवसाला शेकडो वेळा वीज पुरवठा खंडित 
◼️इलेक्ट्रॉनिक साहित्य व कामकाजात मोठे नुकसान 

देवरी : देवरी तालुक्यात पुराडा, लोहारा, सुरतोली या गावांना अघोषित भारनियमनाचा फटका सहन करावा लागत असून १ महिन्यापासून विजेच्या लपंडावाची आणि भारनियमनाची संतापजनक समस्या वाढलेली आहे. उन्हाळ्याच्या तापमानवाढीमुळे विजेअभावी आरोग्यावर मोठा परिणाम झालेला दिसून येत आहे. कृषीप्रधान देशाचा शेतकरी राजा विजेच्या लपंडवामुळे आणि भारनियमनामुळे चिंतेत पडला असून शेतीला पाणीपुरवठा करण्यास असमर्थ ठरत आहे.

पुराडा आणि लोहारा परिसरातील लगतच्या गावांना सुरळीत विद्युत पुरवठा होत असून पुराडा आणि लोहारा गावावर अन्याय का ? याचा जाब विचारण्यासाठी काल रात्रीच्या सुमारास मुल्ला सब स्टेशन येथे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी गर्दी केली परंतु महावितरनच्या अधिकाऱ्यांनी कुठलीही प्रतिक्रिया न देता फोन बंद करून पसार झाल्याचे सांगण्यात येते. विद्युत पुरवठा सुरळीत करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

नुकताच उन्हाळा आणि उष्ण वातावरणाला सुरुवात झाली असून विजेचा लपंडाव मोठ्याप्रमाणात सुरु झाला आहे. त्यामुळे देवरीवाशी तसेच तालुक्यातील ग्रामवाशी त्रस्त झाल्याचे बघावयास मिळत आहे. वीजवितरण कंपनीच्या अनियोजित कामामुळे ही स्थिती निर्माण झाली असून जनसामान्याला असह्य त्रास होत आहे

Share