पोलिसांना गणवेशात ‘रील्स’ आणि ‘मिनी-व्लॉग’ वर बंदी

मुंबई : सोशल मीडियावर वाढत चाललेल्या ‘रील्स’ आणि ‘मिनी-व्लॉग’ला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गणवेशात असताना कोणत्याही पोलिस अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने सोशल मीडियावर व्हिडिओ तयार करून पोस्ट करू नयेत, असे कडक निर्देश देण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.

परिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे व्हिडिओंमध्ये अनेकदा नकळत कार्यालयीन परिसर, शासकीय वाहने, उपकरणे किंवा कर्तव्याशी संबंधित संवेदनशील माहिती दिसून येते. यामुळे पोलिस विभागाच्या गोपनीयतेला आणि कार्यात्मक सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. यापुढे सोशल मीडियावर अशा प्रकारचे व्हिडिओ आढळल्यास संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

विशेष शाखेचे उपायुक्त दत्तात्रय कांबळे यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, महाराष्ट्र पोलिस दलातील 51 हजार पोलिस कर्मचाऱ्यांना हा आदेश लागू करण्यात आला आहे.

या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी मुंबई पोलीस दलातील सोशल मीडिया लॅबला विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवून नियमभंगाच्या घटना नोंदवणे आणि वरिष्ठांना अहवाल सादर करणे, असे आदेश लॅबच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

राज्य सरकारने जुलै 2025 मध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापराबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक आणि अधिकृत सोशल मीडिया खाती वेगळी ठेवावीत, शासकीय पदनाम, लोगो, कार्यालयाचा पत्ता किंवा शासकीय मालमत्ता वैयक्तिक खात्यावर वापरू नये, तसेच कोणतीही गोपनीय माहिती पूर्वपरवानगीशिवाय प्रसारित करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें