जिल्हात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी धानाला दिलासा

Deori: पहाटेपासून हवामानात अचानक बदल होत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. देवरीसह गोरेगाव, सडक अर्जुनी, देवरी, सालेकसा , गोंदिया आदी तालुक्यांसह जिल्ह्याच्या अनेक भागांत मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या अनपेक्षित पावसामुळे काही पिकांना दिलासा मिळण्याची शक्यता असली, तरी भाजीपाला व फळबागांवर संकटाचे सावट निर्माण झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. सोमवारी पहाटेपासून अनेक भागांत अचानक पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची धांदल उडाली. रब्बी हंगामातील उन्हाळी धान पिकासाठी हा पाऊस पोषक मानला जात आहे. पावसामुळे जमिनीतील ओलावा वाढून धान पिकाला फायदा होईल, अशी शक्यता कृषी तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात समाधानाचे वातावरण आहे.

दुसरीकडे भाजीपाला, कडधान्ये आणि फळबागांसाठी हा पाऊस धोकादायक ठरू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे. ढगाळ हवामान कायम राहिल्यास बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.भाजीपाल्याच्या पिकांनाही या अवकाळी पावसाचा फटका बसण्याची भीती असून, शेतकऱ्यांनी तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. एकूणच, अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात कुठे दिलासा तर कुठे चिंतेचे वातावरण निर्माण झाले.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें