वन कायद्यामुळे रखडलेल्या १५० हून अधिक तलावांसह दवागड-सात बहिणी सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याची आमदार संजय पुराम यांची मागणी
मुंबई / देवरी |महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित महत्त्वाच्या प्रश्नांकडे आमदार संजय पुराम यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. विशेषतः वन कायद्यामुळे रखडलेल्या सिंचन प्रकल्पांचा मुद्दा त्यांनी प्रभावीपणे मांडत शासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली.
सभागृहात बोलताना आमदार पुराम यांनी सांगितले की, सालेकसा व देवरी हे वनव्याप्त तालुके असल्याने वन कायद्याच्या अडचणींमुळे गेल्या अनेक दशकांपासून सुमारे १५० हून अधिक तलावांची कामे प्रलंबित आहेत. तसेच देवरी तालुक्यातील २५ वर्षांपूर्वीचा दवागड-सात बहिणी मध्यम सिंचन प्रकल्प वन परवानग्यांच्या अभावी आजही पूर्णत्वास जाऊ शकलेला नाही.
या प्रकल्पांच्या रखडल्यामुळे परिसरातील हजारो शेतकरी सिंचनाच्या गंभीर समस्येला सामोरे जात असून शेती उत्पादनावर त्याचा मोठा परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले. वन कायद्यामुळे निर्माण झालेल्या अडथळ्यांवर तातडीने मार्ग काढून प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती देण्याची मागणी त्यांनी वनमंत्र्यांकडे केली.
हे प्रकल्प पूर्ण झाल्यास हजारो शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होऊन शेती उत्पादनात वाढ होईल, रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल, असा विश्वास आमदार पुराम यांनी व्यक्त केला.
मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाचा प्रश्न शासनापर्यंत पोहोचवून त्यावर सकारात्मक निर्णय व्हावा, यासाठी आपला सातत्यपूर्ण पाठपुरावा कायम राहील, असेही त्यांनी सभागृहात स्पष्ट केले.








