देवरी: राज्यात स्मार्ट मीटरच्या अंमलबजावणीनंतर अनेक भागांत वाढीव वीजबिलांच्या तक्रारी सातत्याने समोर येत असून, सर्वसामान्य ग्राहकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः ग्रामीण भागातील अल्प उत्पन्न गट, शेतकरी, मजूर, छोटे व्यावसायिक आणि हातावर पोट असलेल्या कुटुंबांवर वाढत्या वीजबिलांचा मोठा आर्थिक ताण पडत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
अनेक ग्राहकांचा दावा आहे की, पूर्वी दरमहा ४०० ते ६०० रुपये येणारे वीजबिल स्मार्ट मीटर बसवल्यानंतर अचानक ३ हजार ते ५ हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे. अशा वाढीव बिलांचा भरणा करणे अनेक कुटुंबांसाठी अशक्य होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
ग्रामीण भागात शेतीचे नुकसान, अनियमित पाऊस, रोजगाराचा अभाव, वाढती महागाई आणि कर्जबाजारीपणामुळे नागरिक आधीच आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. त्यातच वाढीव वीजबिलांचा अतिरिक्त भार पडल्याने अनेक कुटुंबांची आर्थिक घडी विस्कटत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
घरखर्च, मुलांचे शिक्षण, औषधोपचार आणि शेतीचा खर्च भागविताना महिन्याला चार ते पाच हजार रुपयांचे वीजबिल भरणे शक्य नसल्याने विद्युत पुरवठा खंडीत होण्याची भीती, मीटर बसविण्यापूर्वी पुरेशी जनजागृती न केल्याचा आरोप तसेच ग्रामीण भागातील नेटवर्क आणि तांत्रिक अडचणींमुळे मीटरच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
जनआक्रोशाचा भडका उडण्याचा धोका
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत स्मार्ट मीटरविरोधात आंदोलने, निवेदने आणि निषेध आंदोलन सुरू असून, सामाजिक संघटना, व्यापारी संघटना, शेतकरी संघटना आणि नागरिकांनी स्मार्ट मीटरची सक्ती थांबवावी, वाढीव बिलांची चौकशी करावी, जबरदस्तीने बसविण्यात आलेले स्मार्ट मीटर काढून पूर्वीचे मीटर पुन्हा बसवावेत तसेच ग्राहकांना तातडीने दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे.








