देवरी : ३१ जुलै : भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी सविता पुराम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती भाजपाचे महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य चित्रा वाघ यांनी जाहीर केली.
सविता पुराम यांनी यापूर्वी विश्व मांगल सभा, विदर्भ प्रदेश या संघटनेची जबाबदारी प्रभावीपणे सांभाळत सामाजिक आणि संघटनात्मक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. तसेच भारतीय जनता पक्षात विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत पक्ष संघटना बळकट करण्यासाठी त्यांनी सातत्याने योगदान दिले आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर महिला प्रदेश उपाध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे.
राजकीय कारकिर्दीत त्यांनी गोंदिया जिल्हा परिषदेत महिला व बालकल्याण सभापती म्हणून सलग दोन कार्यकाळ यशस्वीरीत्या काम पाहिले आहे. सध्या त्या पुराडा जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून कार्यरत असून ग्रामीण भागातील विकासकामे, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक प्रश्नांवर सातत्याने कार्य करत आहेत.
या नियुक्तीबद्दल पुराम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, गोंदिया जिल्हा भाजप अध्यक्ष सीता रहांगडाले तसेच आमदार संजय पुराम यांचे मार्गदर्शन व पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ता आणि विश्वासामुळे ही जबाबदारी मिळाल्याचे सांगत त्यांचे आभार मानले.








