देवरी महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकने ई-रिक्षाला उडविले

भर्रेगाव फाट्याजवळ अपघात; चार जणांची प्रकृती गंभीर, गोंदियाला हलविले

देवरी : रायपूर–नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर भर्रेगाव फाट्याजवळ बुधवारी (दि. १८) सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास भरधाव ट्रकने ई-रिक्षाला मागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात ई-रिक्षाचालकासह प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी गोंदिया येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, ई-रिक्षा क्रमांक एमएच ३५ एएच २२०३ मधून चालकासह प्रवासी प्रवास करीत होते. दरम्यान, मागून आलेल्या ट्रक क्रमांक सीजी ०८ एझेड २४५१ ने ई-रिक्षाला जोरदार धडक दिली. धडकेमुळे ई-रिक्षातील प्रवासी जखमी झाले. अपघातानंतर जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालय, देवरी येथे दाखल करण्यात आले.

या अपघातात अनन्या भाऊराव चुटे (१८), गुंजन भाऊराव चुटे (१७), हर्षिता राजेंद्र सरोटे (१७), रा. कुंभारटोला; भानुबाई निपुर मडावी (४०), रा. भर्रेगाव; वेदिका संजय गाते (१३) व युक्तिका संजय गाते (४), दोघी रा. शिरपूर; तसेच ई-रिक्षाचालक देवेंद्र संपत सरोटे (४५), रा. शिरपूर हे जखमी झाले आहेत.

जखमींपैकी अनन्या चुटे, वेदिका गाते, हर्षिता सरोटे या तीन शाळकरी मुली आणि भानुबाई मडावी यांची प्रकृती गंभीर असल्याने ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी गोंदिया येथे हलविण्यात आले.

ई-रिक्षातील प्रवासी क्षमतेचा प्रश्न ऐरणीवर

या अपघातामुळे ई-रिक्षांमधील प्रवासी क्षमता आणि सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ई-रिक्षामध्ये चालकासह मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करीत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये शाळकरी मुलांचाही समावेश होता.

विशेषतः शाळकरी मुलांची वाहतूक करताना वाहनाची निर्धारित प्रवासी क्षमता, सुरक्षितता आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन होणे अत्यंत आवश्यक आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहून नेल्यास अपघाताच्या वेळी गंभीर परिणाम होण्याची शक्यता वाढते.

त्यामुळे ई-रिक्षांची प्रवासी क्षमता, शाळकरी मुलांची वाहतूक, वाहनांची फिटनेस स्थिती आणि वाहतूक नियमांचे पालन याबाबत संबंधित परिवहन विभागाने कठोर तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें