देवरी – भारतीय सणात पाच दिवसीय दीपावली सण हा सर्वात मोठा सण असून फक्त मौजमजा करण्यासाठीच नव्हे. तर परिवारातील सर्व सदस्यांमध्ये, मित्र मंडळींमध्ये आणि जात, पात व धर्माच्याही पलिकडे जाऊन आपसात गावागावातील सर्वांमध्ये स्नेहाचे व आपुलकीचे संबंध सर्वत्र जुळून येतात, असे प्रतिपादन आमदार संजय पुराम यांनी केले.
ते देवरी येथील सुप्रसिध्द मॉ धुकेश्वरी सार्वजनिक मंदिर समितीकडून दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण ९ नोव्हेंबरला आयोजित दीपावली मिलन कार्यक्रमात अध्यक्ष मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी मंचावर नगराध्यक्ष संजू उईके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रमोद संगीडवार, संचालक यादोराव पंचमवार, पंचायत समितीचे माजी सभापती सुखचंद राऊत, माजी उपसभापती संतोष तिवारी, ठाणेदार गणेश वणारे, मुस्लिम समाज समितीचे अध्यक्ष जुनेद खान, बौद्ध समाजाचे तारेष मेश्राम, सिख समाजाचे रिंकी भाटीया, मारवाडी समाजाचे रामअवतार अग्रवाल, जैन समाजाचे संजय जैन, कलार समाजाचे रतिराम दरवडे, मंदिर समितीचे अध्यक्ष ॲड. प्रशांत संगीडवार, उपाध्यक्ष कुवरलाल भेलावे असे विविध समाजाचे आणि धर्माचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंदिर समितीचे अध्यक्ष ॲड. प्रशांत संगीडवार, संचालन प्रा. प्रभू मनगटे तर, उपस्थित सर्वांचे आभार सुरेश चन्ने यांनी मानले.
यशस्वीतेसाठी मंदिर समितीच्या सर्व पदाधिकारी, सदस्य आणि भक्तांनी सहकार्य केले.








