आमदार संजय पुराम व नगर अध्यक्ष संजू उईके यांची मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मागणी; तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश
देवरी: देवरी शहराला विजेच्या खांबांपासून मुक्त करण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण शहरात भूमिगत वीज वाहिनी टाकण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन योजनेअंतर्गत ४० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय यशुबाई हनुमंतराव पुराम आणि नगर अध्यक्ष संजू उईके यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन सादर केले.
आमदार संजय पुराम यांनी पत्रात नमूद केले आहे की, आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्र हे आदिवासीबहुल, अत्यंत दुर्गम आणि नक्षलग्रस्त क्षेत्र आहे. शहरात भूमिगत वीज वाहिनी नसल्याने रस्त्यांवरील विजेच्या खांबांवर तारा लटकलेल्या असतात. त्यामुळे नागरिक तसेच पाळीव जनावरांच्या बाबतीत गंभीर अपघात होण्याची भीती सतत निर्माण झालेली असते. शहरात भूमिगत केबलिंग झाल्यास हे अपघात टाळता येतील आणि शहरातील रस्ते विजेच्या खांबांच्या जाळ्यातून मुक्त होतील.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे ४० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आमदार संजय पुराम आणि नगर अध्यक्ष संजू उईके यांनी आपत्ती व्यवस्थापन योजनेतून हा ४० कोटी रुपयांचा निधी लवकरात लवकर मंजूर करण्याची विनंती केली असता, मंत्री गिरीश महाजन यांनी या प्रकल्पाचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत.








