देवरी: दिवाळीचा सण म्हणजे आनंद, उत्साह आणि आपुलकीची देवाणघेवाण. याच सणाच्या पार्श्वभूमीवर माजी महिला बालकल्याण सभापती तथा विश्वमांगल्य सभेच्या पूर्व विदर्भ जनप्रतिनिधि सहसंयोजिका सविताताई संजयजी पुराम यांनी एक अत्यंत स्तुत्य आणि संवेदनशील उपक्रम राबवून यावर्षीची दिवाळी खऱ्या अर्थाने सार्थ ठरवली आहे. गोदिंया जिल्ह्यातील बोरगाव बाजार, कडिकसा,जमाकुडो, पुराडा,व बीजेपार या आश्रमशाळांमधील आई वडील नसलेले एकूण २४ अनाथ विद्यार्थ्यांची आज ३० शुक्रवार रोजी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना नवीन कपडे व मिठाई भेट देण्यात आली, तसेच त्यांच्यासोबत गोड वातावरणात दिवाळी साजरी करण्यात आली.
या विशेष प्रसंगी केवळ दिवाळी साजरी न करता, सविताताईंनी या सर्व २४ अनाथ विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारण्याची घोषणा केली. “आजपासून या मुलांसोबत एक नवीन नाते जोडत असून, त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक भविष्य घडविण्यासाठी सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे माझे कर्तव्य आहे,” अशी भावना त्यांनी या वेळी व्यक्त केली.
या उपक्रमामुळे अनाथ मुलांच्या चेहऱ्यावर आलेले आनंदाचे हास्य आणि त्यांना मिळालेली पालकछत्रपतीची उब उपस्थित सर्वांचे मन जिंकून जाणारी ठरली. समाजातील संवेदनशील नेतृत्वाने घेतलेला हा वसा इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.









