देवरीत कंटेनर ट्रकचे लॉक तोडून ८६ एलईडी टीव्हींची चोरी; अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

◾️शिरपूर चेकपोस्टजवळील घटना; सुमारे १६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस

देवरी: देवरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिरपूर चेकपोस्टजवळ अज्ञात व्यक्तीने कंटेनर ट्रकचे मागील लॉक तोडून एलजी कंपनीचे एलईडी टीव्ही चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी देवरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी सुरेंद्र रॉय (वय २६ वर्षे), रा. मोहम्मदपूर, ता. पाटेअर, जिल्हा वैशाली, राज्य बिहार हे कंटेनर ट्रकमधून एलजी कंपनीचे एलईडी टीव्ही घेऊन राजनांदगावमार्गे पुणे येथून कोलकाता येथे जात होते. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील शिरपूर चेकपोस्ट येथे ट्रक थांबविण्यात आला होता.

याच संधीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने कंटेनरच्या मागील बाजूचे लॉक तोडून त्यामधील ३२ इंच आकाराचे ८६ नग एलईडी टीव्ही चोरून नेल्याचे फिर्यादीच्या तोंडी रिपोर्टवरून समोर आले आहे. चोरीस गेलेल्या मालाची अंदाजे किंमत १६ लाख ५० हजार रुपये असल्याची नोंद पोलिसांच्या प्राथमिक माहितीत आहे.

सदर घटनेच्या अनुषंगाने देवरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३८१/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०५(ब) बी एन एस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास सपोनी मुकेश राठोड करीत असून प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक गणेश वनारे यांची नोंद आहे. चोरीचा माल कुठे नेण्यात आला आणि या घटनेत कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें