कडिकसा येथे सायबर सुरक्षा, रस्ता सुरक्षा व महिला सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चिचगड पोलीस ठाण्याचा जनजागृतीपर उपक्रम

देवरी / चिचगड : विद्यार्थ्यांमध्ये सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता निर्माण करणे, वाहतुकीचे नियम पाळण्याची सवय लावणे आणि महिला सुरक्षेबाबत संवेदनशीलता वाढविण्याच्या उद्देशाने मौजा कडिकसा येथे सायबर सुरक्षा, रस्ता सुरक्षा व महिला सुरक्षा या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

चिचगड पोलीस ठाण्याचे ठाणेदार जनार्दन हेगडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आला. यावेळी महिला पोलीस अंमलदार छाया कटरे आणि पोलीस हवालदार सोहन कोरोटी यांनी विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

सायबर सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांना ऑनलाइन आर्थिक फसवणूक, बनावट जाहिराती, सोशल मीडियावरील फसवणूक, ओटीपी व पासवर्डची गोपनीयता तसेच अनोळखी लिंकपासून सावध राहण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. डिजिटल व्यवहार करताना सतर्कता बाळगावी आणि वैयक्तिक माहिती कोणासोबतही अनावश्यकपणे शेअर करू नये, असे आवाहन करण्यात आले.

रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने वाहतुकीचे नियम पाळणे, दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करणे आणि रस्त्यावर स्वतःसह इतरांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच महिला सुरक्षेबाबत जागरूक राहणे, महिलांचा सन्मान करणे, अनुचित प्रकारांविरोधात आवाज उठविणे आणि गरज पडल्यास पोलिसांची मदत घेणे याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले.

ठाणेदार जनार्दन हेगडकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेची जाणीव, सामाजिक जबाबदारी आणि कायद्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध, रस्ते अपघातांपासून संरक्षण आणि महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने अशा जनजागृतीपर कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले.

पोलीस विभाग आणि समाज यांच्यातील संवाद अधिक दृढ करून जागरूक, जबाबदार व सुरक्षित समाजनिर्मितीस हातभार लावणारा हा उपक्रम ठरला.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें