देवरी येथे मोफत दमा औषध वितरण शिबिरात ९७५ रुग्णांना औषधांचे वितरण

◾️सुवर्णप्राशन फाऊंडेशन व दिनबंधू ग्रामीण विकास संस्थेचा संयुक्त उपक्रम; सलग पाच वर्षांपासून आयोजन.

    देवरी, दि. २५ ऑक्टोबर : कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने सुवर्णप्राशन फाऊंडेशन आणि दिनबंधू ग्रामीण विकास संस्था,साथ मैत्रीची साकोली आणि मित्र परिवार देवरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत दमा आजार औषध वितरण शिबिरात एकूण ९७५ रुग्णांना औषधांचे वितरण करण्यात आले. या शिबिरात गोंदिया जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतील रुग्णांचाही समावेश होता. गेल्या पाच वर्षांपासून या शिबिराचे सातत्याने आयोजन करण्यात येत असून, यापूर्वीच्या शिबिरांत सहभागी झालेल्या रुग्णांनीही यावेळी लाभ घेतला.

    शहरातील आफताब मंगल कार्यालय, चिचगड रोड, देवरी येथे आयोजित या शिबिराचे उद्घाटन नगरपंचायत देवरीचे नगरसेवक आफताब शेख यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश तटकरे होते.

    यावेळी विशेष अतिथी म्हणून चिचगड पोलीस स्टेशनचे ठाणेदार जनार्धन हेगडकर आणि डॉ. गुरुदेव कापगते उपस्थित होते. प्रमुख अतिथींमध्ये डॉ. खुशाल निकोडे,धनश्री बिसेन, सुवर्णप्राशन फाऊंडेशनचे अध्यक्ष आयुर्वेदाचार्य डॉ. सुनील समरीत, गोंदिया जिल्हा शिक्षक सहकारी पतसंस्थेचे संचालक राजेश रामटेके, ब्लॉसम पब्लिक स्कूल, देवरीचे प्राचार्य डॉ. सुजित टेटे तसेच सुवर्णप्राशन फाऊंडेशनचे विश्वस्त रुपेश परशुरामकर यांची उपस्थिती होती.

    दमा, जुनाट सर्दी, खोकला आणि ॲलर्जी यांसारख्या श्वसनविकारांनी त्रस्त रुग्णांना आयुर्वेदिक उपचार व औषधांचा लाभ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. सलग पाच वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याने विविध भागांतील रुग्णांचा त्याला प्रतिसाद मिळत आहे. आरोग्यसेवेच्या माध्यमातून समाजातील गरजू रुग्णांपर्यंत पोहोचण्याचा आयोजकांचा प्रयत्न या उपक्रमातून दिसून आला.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुवर्णप्राशन फाऊंडेशनचे अध्यक्ष आयुर्वेदाचार्य डॉ. सुनील समरीत यांनी केले. संचालन प्रा. मधू दिहारी यांनी केले, तर आभार प्रदर्शन चेतन उईके यांनी मानले.

    शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विलास शिंदे, युगेश बिसेन, चेतक झंजाळ, विनोद चौधरी, शुभम वाडिभस्मे, दीपक लांजेवार, सौ. हितेश्री समरीत, सौ. कल्याणी लांजेवार, सिद्धांत शाहू, अंकुश गुप्ता, सुशील जैन, भुवनेश निर्वाण, केशव मोदी, नागेश कसोंदि, मुनेश्वर राऊत, सुरेश राठी, शोभेलाल नाईक, योगराज साखरे आणि तपेश काशिवार दिनबंधु ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष कुलदिप लांजेवार यांनी सहकार्य केले.

    “सलग पाच वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमातून ९७५ रुग्णांना औषधांचा लाभ मिळाल्याने आयोजकांच्या सामाजिक आरोग्यसेवेच्या प्रयत्नांना व्यापक प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले.”

    Share

    👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

    और पढ़ें