गो-पालक महिलांना मिळतोय रोजगार, पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश
गोंदिया (प्रहार टाईम्स वृत्तसेवा): दिवाळी म्हटली की रोषणाई आणि दिव्यांची आरास आलीच. मात्र, हीच दिवाळी प्लास्टिकमुक्त आणि पर्यावरणपूरक व्हावी या उदात्त हेतूने नागपूर येथे भव्य ‘दिवा महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात गोंदिया जिल्ह्याचा मान वाढवणारे उत्पादन ठरणार आहे ते म्हणजे गोंदियातील गाईच्या शेणापासून बनवलेले आकर्षक दिवे. यामुळे स्थानिक गो-पालक महिलांना रोजगार तर मिळतोच, शिवाय पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचा संदेशही सर्वदूर पोहोचतो.
नागपूर येथील प्रसिद्ध हॉटेल तुली इम्पेरियल येथे दिनांक २४ व २५ ऑक्टोबर रोजी दोन दिवसीय दिवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात राज्यभरातील पर्यावरणपूरक उत्पादनांना व्यासपीठ मिळणार असून, यात गोंदिया जिल्ह्यातील ‘गौ लक्ष्मी’ संस्थेच्या स्टॉलला विशेष आकर्षण असणार आहे.
गोंदिया शहरालगत असलेल्या चुटीया गावात गौ लक्ष्मी संस्थेच्या माध्यमातून संचालिका प्रीती टेंभरे या गेल्या अनेक वर्षांपासून गो-आधारित उद्योगात कार्यरत आहेत. देशी गीर गाईच्या शेणापासून त्यांनी दिवे, धूप, शुभ-लाभ, लक्ष्मी-गणेश मूर्ती, तोरण यांसारखे पूजेचे साहित्य तयार करण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. केवळ व्यवसाय हा उद्देश नसून गाईचे शेण हे पवित्र असून लक्ष्मीचे प्रतीक आहे, तसेच त्यापासून बनलेले उत्पादन हे पूर्णपणे पर्यावरणपूरक असून वापरानंतर खत म्हणूनही उपयोगी पडतात, असा पर्यावरणपूरक संदेश त्यांनी दिला आहे.
यंदाच्या दिवाळीत त्यांनी तयार केलेल्या हजारो शेणाच्या दिव्यांना मोठी मागणी आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागपूरच्या दिवा महोत्सवात त्यांच्या उत्पादनांची विशेष प्रदर्शनी व विक्री मांडण्यात येणार आहे. यामुळे स्थानिक गो-पालक महिलांना रोजगार मिळण्यासोबतच पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचा संदेशही सर्वदूर पोहोचत आहे. हा महोत्सव नागपूरकरांसाठी केवळ खरेदीचा उत्सव नसून आपली संस्कृती आणि पर्यावरण यांची सांगड घालणारा उपक्रम ठरणार आहे.








