‘दिवाळी पहाट’मध्ये रंगली सप्तसुरांची अविस्मरणीय मैफील

स्वरा लाड यांच्यासह गायकांच्या सुरेल सादरीकरणाने देवरीकर मंत्रमुग्ध

देवरी : दिनबंधू ग्रामीण विकास संस्था, देवरीच्या वतीने धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर आयोजित करण्यात आलेल्या ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमात सप्तसुरांची अविस्मरणीय मैफील रंगली. “पहाट दिवाळीची… साथ सुरेल स्वरांची!” या संकल्पनेवर आधारित या संगीतमेळ्याला देवरीकर संगीतप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शुक्रवार, दि. ६ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे ५ वाजता तालुका क्रीडा संकुल मैदान, पोलीस स्टेशनच्या बाजूला, चिचगड रोड, देवरी येथे हा कार्यक्रम पार पडला. पहाटेच्या प्रसन्न वातावरणात सुरेल गीतांनी उपस्थित रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरल्या स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार – छोटे उस्ताद-३’ फेम अष्टपैलू गायिका कु. स्वरा लाड (मुंबई). त्यांच्या दमदार व सुरेल सादरीकरणाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. यासोबतच प्रतिभावान गायक गोपाल सालोडकर आणि यशराज यावले यांनी विविध गीतांची सादरीकरणे करून वातावरणात रंगत आणली.

कार्यक्रमाचे निवेदन विजय वाहोकर यांनी प्रभावीपणे केले. संगीत संयोजनात रामेश्वर काळे (कीबोर्ड), अभिषेक लोखंडे (गिटार/पॅड), विशाल पांडे (ढोलक) यांनी साथसंगत केली, तर बिरेद्र गावंडे यांनी साऊंड व ऑडिओची जबाबदारी सांभाळली.

पहाटेच्या शांत, प्रसन्न वातावरणात एकापेक्षा एक सरस गीतांचे सादरीकरण झाल्याने उपस्थित रसिकांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. पारंपरिक दिवाळी उत्सवाला संगीताची सुरेल जोड देणारा हा उपक्रम देवरीकरांसाठी संस्मरणीय ठरला.

या कार्यक्रमाची संकल्पना व संयोजन ‘मित्र परिवार, देवरी’ यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक, कलाकार, संगीतकार, स्वयंसेवक तसेच उपस्थित संगीतप्रेमी नागरिकांचे सहकार्य लाभले.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें