आदिवासी बहुल दुर्गम भागातील २५ कुटुंबांसोबत साजरी केली आनंदाची दिवाळी!

‘आमची दिवाळी वंचितांसाठी’ उपक्रमाचे आठवे वर्ष; १६७ लाभार्थ्यांना साहित्याचे वितरण

देवरी : दिवाळीचा आनंद समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा आणि वंचितांच्या जीवनातही आनंदाचा प्रकाश निर्माण व्हावा, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून दिनबंधु ग्रामीण विकास संस्था, देवरी,सुवर्णप्राशन फाउंडेशन आणि मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणारा ‘आमची दिवाळी वंचितांसाठी’ हा सामाजिक उपक्रम यंदा आठव्या वर्षात पदार्पण करत उत्साहात संपन्न झाला.या उपक्रमांतर्गत सोमवार, दि. ९ नोव्हेंबर २०२६ रोजी गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील अतिदुर्गम, आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त भागातील फुलगोंदी या गावात विशेष भेट देण्यात आली. यावेळी गावातील २५ कुटुंबांमधील एकूण १६७ लाभार्थ्यांना नवीन कपडे, फराळ, मिठाई तसेच विद्यार्थ्यांना शालेय व क्रीडा साहित्याचे वितरण करण्यात आले.शहरी भागात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना दुर्गम भागातील गरजू कुटुंबांनाही सणाचा आनंद अनुभवता यावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येतो. केवळ साहित्याचे वितरण न करता या कुटुंबांसोबत आनंदाचे क्षण वाटून घेत दिवाळी साजरी करण्यात आली. लहान मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि कुटुंबांच्या चेहऱ्यावरील समाधानाने या उपक्रमाला विशेष अर्थ प्राप्त झाला.
या कार्यक्रमाला चिचगड पोलीस स्टेशनचे ठाणेदार जनार्धन हेगडकर, गटशिक्षणाधिकारी गणेश टाकसाळे, प्राचार्य मनोज भुरे, चिचगडचे वैद्यकीय अधिकारी लक्ष्मीकांत जाटवे, प्रेमलाल हिडामी (गाव प्रमुख),पोलीस पाटील विजय हिडामी यांची विशेष उपस्थिती होती.कार्यक्रमाचे संचालन प्रा.अनिल होळी यांनी तर प्रास्ताविक चेतन उईके यांनी केले.
सुवर्णप्राशन फाउंडेशनचे अध्यक्ष आयुर्वेदाचार्य डॉ. सुनील समरीत आणि दिनबंधू ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष कुलदिप लांजेवार यांच्या पुढाकारातून आणि मित्रपरीवाराच्या विशेष सहकार्यातून मागील सात वर्षांपासून सातत्याने हा उपक्रम राबविण्यात येत असून,यावर्षी या उपक्रमाच्या आयोजनाचे आठवे वर्ष होते. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी संदीप महोबिया, चेतक झंजाळ ,. सोमाजी आस्वले, अरविंद शेंडे, टिकाराम मातवारे, विनोद चौधरी, दिवाकर शेंद्रे, दीपक लांजेवार, राजू पटले, मनोहर भुते, शरद समरीत, रंजित धमगाये, लेखराम चांदेवार, संजय महोबिया,. शोभेलाल नाईक, योगराज साखरे,. किरण रामटेके, जितेंद्र वालदे, सिद्धांत शाहू, भुवनेश निर्वान, सितेश ईश्वर,राजु पटले, मनोज कोडापे, सुरेश राठी, संदीप गुप्ता, हितेश्री समरीत,. कल्याणी लांजेवार, प्रगती लांजेवार आणि डिंपल समरीत यांनी विशेष सहकार्य केले.
‘आपल्या घरातील दिव्यांचा प्रकाश तर सर्वांनाच दिसतो; मात्र दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश निर्माण करणे, हीच खरी दिवाळी!’ या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाने सामाजिक एकोपा, माणुसकी आणि सेवाभावाचा प्रेरणादायी संदेश दिला.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें