बोंडरानी जंगल हत्याकांडाचा थरारक उलगडा
जीपीएस ॲपद्वारे लोकेशन ट्रॅक करून रचला हत्येचा कट; गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, चौघे जेरबंद
गोंदिया (प्रहार टाईम्स): दवनीवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा बोंडरानी येथील जंगलात घडलेल्या वर्षा तुरकर खून प्रकरणाचा उलगडा करण्यात गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) मोठे यश आले आहे. पतीचे मृत महिलेशी असलेल्या प्रेमसंबंधांतून त्रस्त झालेल्या पत्नीनेच तब्बल १३ लाख रुपयांची सुपारी देऊन पतीच्या मैत्रिणीचा काटा काढल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुपारी देणारी पत्नी, मध्यस्थ व गुन्हेगारांसह चौघांना ताब्यात घेतले असून दोन फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
नेमकी घटना काय होती?
मृतक वर्षा धुरनलाल तुरकर (वय ३५ वर्षे, रा. धानोरी, जि. पुणे) या दिवाळीच्या सुट्टीत आपल्या माहेरी मौजा किन्ही (ता. खैरलांजी, जि. बालाघाट) येथे आल्या होत्या. दि. १४ नोव्हेंबर २०२६ रोजी त्या गोंदिया येथील आपला मित्र नितेश अग्रवाल याच्यासोबत तिरोडा येथे गेल्या होत्या. तेथून परत येत असताना सायंकाळी ५.३० ते ६.०० वाजेच्या सुमारास मौजा बोंडरानी येथील शिवमंदिराजवळील जंगलात थांबले असता, अज्ञात तीन इसमांनी वर्षा तुरकर यांच्या पोटावर व पाठीमागे चाकूने सपासप वार करून त्यांची निर्घृण हत्या केली. या घटनेप्रकरणी तक्रारीवरून दवनीवाडा पोलीस ठाण्यात दि. १५ नोव्हेंबर २०२६ रोजी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) अन्वये गुन्हा (अपराध क्र. ५५०/२०२६) दाखल करण्यात आला होता.
२०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या तपासणीतून लागला छडा
या गंभीर गुन्ह्याचा तात्काळ छडा लावण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रेवचंद सिंगनजुडे यांना दिले होते. त्यानुसार पोनि सिंगनजुडे यांनी अधिकारी व अंमलदारांची ६ विशेष पथके तयार केली. या पथकांनी मागील चार दिवसांत घटनास्थळापासून तिरोडा, खैरलांजी, वाराशिवनी, बालाघाट ते गोंदिया या संपूर्ण मार्गावरील जवळपास २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. यामध्ये तीन संशयित इसम मोटारसायकलवरून नितेश अग्रवाल यांच्या चारचाकी वाहनाचा पाठलाग करताना दिसून आले. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी दि. १९ नोव्हेंबर रोजी मौजा मुर्री (गोंदिया) येथून संशयित इमरान करीम शेख (वय २६) याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता संपूर्ण कटाचा पर्दाफाश झाला.
१३ लाखांची सुपारी आणि ‘जीपीएस ॲप’चा वापर
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पती नितेश अग्रवाल आणि वर्षा तुरकर यांच्यातील प्रेमसंबंधांमुळे त्रस्त झालेल्या पत्नी सौ. मोना नितेश अग्रवाल हिने घराजवळ राहणारा कुणाल कुंभलकर याच्या मदतीने हत्येचा कट रचला. कुणाल कुंभलकर याने कुख्यात सराईत गुन्हेगार शाहरुख पठाण याच्याशी संपर्क साधून १३ लाख रुपयांत वर्षा तुरकर यांना ठार मारण्याची सुपारी दिली. शाहरुख पठाण याने मुर्री येथील इमरान करीम शेख, नलेन ऊर्फ नायलान शेख आणि क्रिश राऊत या तिघांवर खुनाची जबाबदारी सोपवली.
विशेष म्हणजे, नितेश अग्रवाल यांची कार पत्नीच्या नावावर असल्याने, पत्नीने कारमधील जीपीएस मोबाईल ॲपचा (‘टोयोटा आय-कनेक्ट’ ॲप) आयडी व पासवर्ड आरोपींच्या मोबाईलमध्ये देऊन ते ॲप ॲक्टिव्हेट करून दिले होते. नितेश बालाघाटला गेला असता आरोपींनी मोटारसायकलने त्यांचा पाठलाग केला आणि जीपीएस लोकेशनच्या अचूक माहितीवरून बोंडरानीच्या जंगलात गाठून वर्षा यांची चाकूने भोसकून हत्या केल्याची कबुली दिली आहे.
ताब्यात घेण्यात आलेले आरोपी (चौघे जेरबंद):
- सौ. मोना नितेश अग्रवाल (वय ४१ वर्षे, रा. साई मंगलम लॉनसमोर, गोविंदपूर रोड, गोंदिया)
- कुणाल श्यामलाल कुंभलकर (वय ३१ वर्षे, रा. साई मंदिराजवळ, सिव्हिल लाईन, गोंदिया)
- शाहरुख खान फिरोज खान पठाण (वय ३३ वर्षे, रा. सिंधी कॉलनी, गोंदिया)
- इमरान करीम शेख (वय २६ वर्षे, रा. संजयनगर, मुर्री, जि. गोंदिया)
(टीप: ताब्यात घेतलेल्या चारही आरोपींना पुढील तपासकामी दवनीवाडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. गुन्ह्यातील इतर दोन फरार आरोपी — नलेन ऊर्फ नायलान शेख (वय २४) व क्रिश राऊत (वय १९, रा. संजयनगर, मुर्री) यांचा पोलीस कसून शोध घेत आहेत.)
या पथकाने केली उत्कृष्ट कामगिरी:
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे व अपर पोलीस अधीक्षक श्री. अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रेवचंद सिंगनजुडे यांच्या नेतृत्वात सपोनि अमरदिप खाडे, सपोनि अभिषेक जंगमवार, सफौ राजू मिश्रा, पोहवा इंद्रजित बिसेन, दिक्षीतकुमार दमाहे, सोमेंद्रसिंह तुरकर, रियाज शेख, विठ्ठलप्रसाद ठाकरे, संजय चव्हाण, सुजित हलमारे, नापोशि शैलेश निनावे, पोशि राकेश इंदुरकर, हंसराज भांडारकर, सुनिल उहाके, करण बारेवार, निखिल मेश्राम, छगन विठल्ले, मपोशि स्मीता तोंडरे, चापोशि राम खंडारे, विलेश ठाकरे, इमरान सय्यद, मुरली पांडे तसेच सायबर सेलचे पोशि रोशन येरणे व आकिब काझी यांनी पार पाडली.







