जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत स्वरा शहारेचे सुयश
देवरी | दि. १२ ऑगस्ट २०२६
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने एप्रिल २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ४ थी) मध्ये देवरी येथील ब्लॉसम पब्लिक प्रायमरी स्कूलची विद्यार्थिनी कु. स्वरा धीरजकुमार शहारे हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
स्वराने CBSE/ICSE व इतर अभ्यासक्रम या गटातून परीक्षेत २९८ पैकी २१२ गुण (७१.१४ टक्के) मिळवत जिल्हा गुणवत्ता यादीत ८ वा क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने तिला अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.
स्वराने प्रथम भाषा व गणित या पेपरमध्ये १४८ पैकी ११६ गुण, तर तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी या पेपरमध्ये १५० पैकी ९६ गुण मिळवले. तिच्या या यशामुळे ब्लॉसम पब्लिक प्रायमरी स्कूलच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
स्वराच्या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य डॉ. सुजित एच. टेटे, शिक्षकवृंद तसेच पालकांनी तिचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षांकडे सकारात्मक दृष्टीने पाहून सातत्यपूर्ण अभ्यास, योग्य मार्गदर्शन आणि मेहनतीच्या जोरावर यश संपादन करावे, असा संदेश या यशातून मिळत आहे.
स्वरा शाहारेच्या या उज्ज्वल यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.








