जिल्हा नियोजन समितीकडे जि. प. सदस्य उषाताई शहारे यांच्या विविध विकासकामांच्या मागण्या, पालकमंत्र्यांकडून निधी कमी पडू न देण्याचे आश्वासन

देवरी: गोंदिया येथे ३१ जुलै २०२६ रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री इंद्रनील नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत ककोडी जिल्हा परिषद क्षेत्राच्या सदस्य उषाताई शहारे यांनी देवरी तालुक्यासह जिल्ह्यातील विविध मूलभूत विकासकामांकडे प्रशासनाचे लक्ष वेधत आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
तालुक्यातील अनेक रस्ते व मोठ्या पुलियांची दुरवस्था झाल्याने पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अतिवृष्टीच्या काळात काही मार्गांवरील वाहतूक बंद होऊन अनेक गावांचा शहराशी संपर्क तुटतो. परिणामी विद्यार्थी शाळेत जाऊ शकत नाहीत, तर नागरिकांना आरोग्य, बाजारपेठ, रोजगार व इतर अत्यावश्यक सेवांसाठी ये-जा करणे कठीण होते. त्यामुळे आवश्यक ठिकाणी रस्ते व मोठ्या पुलियांच्या बांधकामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करावा, अशी मागणी शहारे यांनी बैठकीत केली.
अंगणवाड्यांच्या दुरवस्थेचा मुद्दा ऐरणीवर
महिला व बालकल्याण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात एकूण १,७२४ अंगणवाड्या आहेत. यापैकी अनेक अंगणवाडी इमारती १५ ते १६ वर्षे जुन्या असून, सुमारे ५० टक्के इमारती जीर्ण झाल्याचे बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आले. जिल्ह्यात ९४ नवीन अंगणवाडी इमारतींची आवश्यकता असून, १६४ अंगणवाडी इमारती अतिजीर्ण असल्याची माहितीही बैठकीत सादर करण्यात आली.
लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता जीर्ण अंगणवाडी इमारतींची तातडीने दुरुस्ती अथवा पुनर्बांधणी करावी तसेच ज्या ठिकाणी अंगणवाडीची स्वतंत्र इमारत उपलब्ध नाही, त्या ठिकाणी नवीन इमारती बांधण्यासाठी निधी द्यावा, अशी मागणी उषाताई शहारे यांनी केली.
जिल्हा परिषद शाळांसाठीही निधीची मागणी
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती सुधारण्यासाठीही विशेष निधीची आवश्यकता असल्याचे शहारे यांनी बैठकीत सांगितले. विद्यार्थ्यांना सुरक्षित व सुविधायुक्त शैक्षणिक वातावरण मिळावे यासाठी शाळांच्या इमारती, आवश्यक दुरुस्ती आणि मूलभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
सर्वसाधारण सभेतही मांडला होता अंगणवाड्यांचा प्रश्न
यापूर्वी १२ जुलै २०२६ रोजी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ककोडी क्षेत्रातील अंगणवाड्यांच्या गंभीर परिस्थितीचा मुद्दा उषाताई शहारे यांनी मांडला होता. जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर तसेच महिला बालकल्याण सभापती पौर्णिमाताई ढेंगे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत त्यांनी तालुक्यातील १२ ठिकाणी अंगणवाडी नसल्याचे, तर १० ठिकाणी अंगणवाडीतील विद्यार्थी दुसऱ्या इमारतीत बसत असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले होते. तसेच १५ अंगणवाडी इमारती जीर्ण अवस्थेत असल्याची माहितीही त्यांनी दिली होती.
निधी कमी पडू देणार नाही : पालकमंत्री
जिल्ह्यातील रस्ते, पूल, अंगणवाड्या आणि जिल्हा परिषद शाळांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी शहारे यांनी पालकमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडे केली. जिल्ह्याच्या तसेच तालुक्याच्या विकासकामांमध्ये निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिल्याचे शहारे यांनी सांगितले.
दरम्यान, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तसेच जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मांडलेल्या मागण्यांपैकी प्रत्यक्षात किती विकासकामांना निधी व प्रशासकीय मंजुरी मिळते, याकडे आता देवरी तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. विशेषतः पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी रस्ते व पुलांची कामे तसेच जीर्ण अंगणवाड्यांच्या पुनर्बांधणीचा प्रश्न तातडीने मार्गी लागावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें