दूषित पाण्यामुळे ४५ जणांना अतिसाराची लागण; आरोग्य विभागाचे पथक गावात तैनात
देवरी: तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मुल्ला अंतर्गत येणाऱ्या वडेगाव येथे दूषित पाण्यामुळे उद्भवलेल्या अतिसाराच्या साथीवर आरोग्य विभागाने नियंत्रण मिळविले आहे. दि. ६ ऑगस्टपासून गावात अतिसाराचे रुग्ण आढळून येत होते. पाच दिवसांच्या कालावधीत एकूण ४५ जणांना अतिसाराची लागण झाली होती. सध्या सर्व बाधित रुग्णांची प्रकृती स्थिर असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांच्या मार्गदर्शनाखाली मुल्ला प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आरोग्य विभागाचे विशेष पथक दि. ६ ऑगस्टपासून वडेगाव येथे तैनात करण्यात आले आहे. या पथकाकडून बाधित रुग्णांवर उपचार करण्यासोबतच संसर्ग नियंत्रणासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त प्रयत्नांतून साथरोग आटोक्यात आणण्यात यश आले आहे.
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी
दि. १० ऑगस्ट रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांनी वडेगाव येथे भेट देऊन आरोग्य विभागाकडून सुरू असलेल्या उपचार व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी आरोग्य पथकाकडून रुग्णांची स्थिती, गावातील पाणीपुरवठा व्यवस्था तसेच साथरोग नियंत्रणासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली.
यावेळी जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल, प्राथमिक आरोग्य केंद्र मुल्लाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वंजारी व डॉ. रामकृष्ण येळणे यांच्यासह आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
पाणीपुरवठा व्यवस्थेची तपासणी
वडेगावमध्ये नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी ३ बोअरवेल, ३ सौरपंप तसेच नळ योजनेच्या २ पाण्याच्या टाक्या आहेत. या सर्व पाणीपुरवठा स्रोतांवर आवश्यक क्लोरिनेशन करण्यासोबतच पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्याचे निर्देश डॉ. गोल्हार यांनी दिले.
ग्रामपंचायत प्रशासनाला पाण्याच्या टाक्यांची तातडीने स्वच्छता करणे, पाईपलाईन व नळांची दुरुस्ती करणे तसेच गावातील स्वच्छता राखण्याच्या सूचना देण्यात आल्या. भविष्यात अशा प्रकारची साथ पुन्हा उद्भवू नये, यासाठी कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देशही देण्यात आले.
घरोघरी सर्वेक्षण; डेंग्यू-मलेरियावरही लक्ष
साथरोग नियंत्रणासाठी आरोग्य पथकाकडून घरोघरी भेट देऊन ताप, अतिसार तसेच इतर संसर्गजन्य आजारांचे रुग्ण शोधण्यात येत आहेत. पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची तपासणी, क्लोरिन व ब्लीचिंग पावडरची मात्रा तपासणे आणि दूषित पाणीपुरवठा रोखण्यावर विशेष भर देण्यात येत आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू व मलेरियाचा धोका लक्षात घेऊन डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट करणे आणि आवश्यकतेनुसार औषध फवारणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांनी वैयक्तिक स्वच्छता राखावी, पाणी उकळून प्यावे आणि संसर्गजन्य आजारांपासून सुरक्षिततेची काळजी घ्यावी, याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
आरोग्य विभाग पूर्णपणे सतर्क
“साथरोग नियंत्रणासाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सतर्क आहे. पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, सर्दी, खोकला आणि गॅस्ट्रोसारख्या संसर्गजन्य आजारांचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विशेष लक्ष देण्यात येत आहे. वडेगावातील परिस्थिती सध्या नियंत्रणात असून नागरिकांनी आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे,” असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांनी सांगितले.








