ब्रिटिशकालीन वैभवाची साक्ष देणारा डोंगरगाव येथील डोये यांचा ऐतिहासिक वाडा

ब्रिटिशकालीन वैभवाची साक्ष देणारा १९०७ सालचा भव्य वारसा

देवरी : गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील डोंगरगाव येथे जमीनदार दाजीबाभाऊ डोये यांचा ऐतिहासिक आणि भव्य वाडा आजही आपल्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभा आहे. ब्रिटिशकालीन स्थापत्यकलेचा अनोखा नमुना असलेल्या या वाड्याला शंभर वर्षांहून अधिक काळाचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे.

सन १९०७ मध्ये ब्रिटिश राजवटीच्या काळात या वाड्याचे बांधकाम करण्यात आले. स्थानिक माहितीनुसार, दाजीबाभाऊ डोये यांच्याकडे तब्बल ४४ गावांची जमीनदारी आणि सुमारे २५ हजार एकर जमीन असल्याचे सांगितले जाते.

मुंबईहून बांधकाम साहित्य, मद्रासहून आले कारागीर

या भव्य वाड्याच्या बांधकामासाठी आवश्यक असलेले विशेष साहित्य मुंबईहून मागविण्यात आले, तर वाड्याच्या बांधकामासाठी मद्रास (सध्याचे चेन्नई) येथील कुशल कारागिरांची मदत घेण्यात आली होती. वाड्याचे बांधकाम आणि साहित्याची जमवाजमव पूर्ण करण्यासाठी तब्बल ६ ते ७ वर्षांचा कालावधी लागल्याचे सांगितले जाते.

मोरबी कंपनीच्या टाईल्स आजही आकर्षणाचा केंद्रबिंदू

या वाड्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याला लावण्यात आलेल्या मोरबी कंपनीच्या चिनी मातीच्या (सिरेमिक) टाईल्स. शंभर वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतरही या टाईल्सचा रंग आणि चमक आजही कायम असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे हा वाडा स्थापत्यकलेच्या दृष्टीनेही विशेष आकर्षण ठरतो.

तीन मजली वाडा आणि भव्य तळघर

वाड्याची रचना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असून हा तीन मजली भव्य वाडा आहे. त्याच्या खाली एक मोठे आणि भव्य तळघर देखील आहे. तत्कालीन काळातील बांधकाम कौशल्य, नियोजन आणि स्थापत्यवैभव यांचा अनोखा संगम या वाड्यात पाहायला मिळतो.

डोये घराण्याच्या पिढ्यान्‌पिढ्या जपला जातोय ऐतिहासिक वारसा

या ऐतिहासिक वाड्याबाबतची माहिती सध्याचे जमीनदार पूर्णचंद्रराव आणि श्यामभाऊ यांचे वडील जमीनदार रामकृष्णराव यांनी दिल्याचे सांगितले जाते. आजही डोये घराण्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या पिढीसह सतीशराव तसेच पाचव्या पिढीतील मुले या वाड्यात गुण्यागोविंदाने वास्तव्यास आहेत.

डोंगरगावचा हा ऐतिहासिक वाडा म्हणजे केवळ एक वास्तू नसून, देवरी तालुक्याच्या इतिहासाची, तत्कालीन सामाजिक व्यवस्थेची आणि ब्रिटिशकालीन स्थापत्यकलेची जिवंत आठवण आहे. या ऐतिहासिक वास्तूचे संवर्धन करून ती भावी पिढ्यांसाठी जतन करण्याची गरज आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें