रेशनच्या नावाने जनतेच्या आरोग्याशी खेळ!

निकृष्ट तांदळाचा पुरवठा; नागरिकांमध्ये संताप

देवरी: शासनाच्या धान्य पुरवठा योजनेतून गरीब व गरजू नागरिकांना पोषणमूल्ययुक्त अन्नधान्य मिळावे, हा उद्देश असताना निकृष्ट दर्जाचा तांदूळ वितरित होत असल्याचा गंभीर प्रकार तालुक्यात समोर आला आहे. अनेक स्वस्त धान्य दुकानातून रेशनकार्डधारकांना अत्यंत निकृष्ट, कचरायुक्त व खाण्यायोग्य नसलेला तांदूळ वितरित केला जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

तांदळाची गुणवत्ता पाहून संतप्त झालेल्या रेशनकार्डधारकांनी थेट धान्यसाठा तात्काळ परत घेऊन चांगल्या दर्जाचा तांदूळ उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

तांदळात कचरा, तुटलेले दाणे आणि मका

शासकीय यंत्रणा आणि राईस मिलर्स यांच्या संगनमतामुळे सर्वसामान्य, गरीब जनतेच्या ताटात निकृष्ट दर्जाचा तांदूळ ढकलला जात असल्याचा आरोप रेशनकार्डधारकांनी केला आहे. प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन निकृष्ट तांदूळ व मका बाजूला करून चांगल्या दर्जाचा तांदूळ उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

पोत्यावर ‘महाराष्ट्र शासन’ असे नमूद असले तरी पोते उघडल्यानंतर त्यामध्ये किडलेला, तुटलेला व कचरा मिश्रित तांदूळ आढळून आल्याचा दावा करण्यात आला आहे.

तांदळासोबत मक्याचा वापर?

रेशन दुकानात तांदळासोबत मक्याचा वापर केला जात असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. ग्रामीण भागात अन्नासाठी मक्याचा वापर करण्याची सवय नसलेल्या नागरिकांना असा तांदूळ स्वीकारणे कठीण जात असल्याने, रेशन दुकानात आलेला मका तात्काळ मागे घेऊन त्याऐवजी नेहमीप्रमाणे गहूचा पुरवठा करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

निकृष्ट धान्याचा पुरवठा झाल्याच्या तक्रारीची प्रशासनाने तातडीने चौकशी करून संबंधित धान्याची गुणवत्ता तपासावी आणि दोषींवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी रेशनकार्डधारक व ग्रामस्थांकडून होत आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें