DRIची देवरीत मोठी कारवाई; बिबट्याची कातडी जप्त, वनविभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह ❓

देवरी-पुराडा मार्गावरील ढिवरिनटोला परिसरात DRIची कारवाई; बिबट्याची कातडी जप्त

देवरी : बिबट्याची कातडी विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) नागपूर प्रादेशिक युनिटच्या पथकाने मंगळवारी, २९ सप्टेंबर रोजी, देवरी-पुराडा मार्गावरील ढिवरिनटोला (मडावीटोला) परिसरातून जेरबंद केले. धनराज रामलाल उईके (३५), रा. ढिवरिनटोला, ता. देवरी आणि नीलकंठ रामचंद्र पांढरे (३७), रा. श्रीरामनगर, ता. सडक अर्जुनी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील धनराज उईके हा ढिवरिनटोला ग्रामपंचायतीचा माजी उपसरपंच असल्याची माहिती आहे.या कारवाईमुळे देवरी परिसरातील वन्यजीवांच्या अवैध शिकारी व तस्करीचे धागेदोरे उलगडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गुप्त माहितीवरून सापळा

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या नागपूर प्रादेशिक युनिटचे अधिकारी आदित्य कुमार बैरवा व जेरी थॉमस यांच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पथकाने परिसरात सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.

आरोपींकडून पांढऱ्या रंगाच्या कापडात गुंडाळलेली बिबट्याची कातडी जप्त करण्यात आली. ही कातडी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अंतर्गत प्रतिबंधित असल्याचे सांगण्यात आले आहे. कारवाईनंतर दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी प्रादेशिक वन विभाग, देवरी यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

माजी उपसरपंच असल्याची माहिती

अटक करण्यात आलेला धनराज उईके हा ढिवरिनटोला ग्रामपंचायतीचा माजी उपसरपंच असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, दोन्ही आरोपींच्या पूर्वीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबतही तपास यंत्रणांकडून पडताळणी केली जात असल्याची माहिती आहे.

कातडी कुठून आली? तस्करीमागे कोण?

आरोपींकडे आढळलेली बिबट्याची कातडी नेमकी कुठून आणि कुणाकडून आणण्यात आली? ती कोणाला विक्री केली जाणार होती? या तस्करीमागे आणखी व्यक्तींचा सहभाग आहे का? असे अनेक प्रश्न या कारवाईनंतर उपस्थित झाले आहेत.

या प्रकरणाचा सखोल तपास झाल्यानंतर वन्यजीवांच्या अवैध शिकारी अथवा तस्करीशी संबंधित आणखी काही प्रकरणे समोर येतात का, याकडे आता लक्ष लागले आहे.

देवरी – गोंदिया वनविभागाच्या यंत्रणेला माहिती नव्हती का?

बिबट्या हा वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ अंतर्गत संरक्षित वन्यप्राणी आहे. त्याची कातडी बाळगणे, खरेदी-विक्री करणे अथवा अवैध व्यापार करणे कायद्याने गुन्हा आहे.

देवरी तालुका हा महाराष्ट्राच्या पूर्वेकडील टोकावर असून छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून आहे. अशा संवेदनशील भागात बिबट्याच्या कातडीची तस्करी सुरू असल्याची माहिती नागपूर येथील DRI पथकाला मिळून कारवाई करण्यात आली. त्यामुळे स्थानिक वनविभागाच्या यंत्रणेला याबाबत पूर्वकल्पना होती का? माहिती असल्यास यापूर्वी कारवाई का झाली नाही? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

या कारवाईनंतर स्थानिक वनविभागाची भूमिका, वन्यजीवांच्या अवैध शिकारीवर ठेवण्यात येणारे नियंत्रण आणि या तस्करीचे संभाव्य पुढील धागेदोरे याबाबत तपासातून काय निष्पन्न होते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें