ब्लॉसम स्कूलमध्ये सायबर सुरक्षा व नशामुक्तीवर मार्गदर्शन कार्यशाळा

देवरी : ब्लॉसम पब्लिक स्कूल, देवरी येथे विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासोबतच नशेच्या दुष्परिणामांपासून दूर राहण्याचा संदेश देण्यासाठी सायबर सुरक्षा आणि नशामुक्ती विषयावर विशेष मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

कार्यशाळेत पोलीस उपनिरीक्षक हर्षा भोंग यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांचे विविध प्रकार, सोशल मीडिया वापरताना घ्यावयाची काळजी, ऑनलाइन फसवणूक, वैयक्तिक माहितीची सुरक्षितता, अनोळखी लिंक व संदेशांपासून सावध राहणे तसेच सायबर गुन्ह्यांची तक्रार करण्याच्या पद्धतीबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा जबाबदारीने आणि सुरक्षितपणे वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी पोलीस हवालदार आशा कांबळे, पोलीस हवालदार लता राजभोज आणि पोलीस वाहक शैलेंद्र नंदेश्वर यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधत नशेचे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम स्पष्ट केले. नशेच्या आहारी जाण्यापेक्षा सकारात्मक विचार, चांगली संगत आणि निरोगी जीवनशैली स्वीकारण्याचा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. सुजित एच. टेटे यांनी केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक ज्ञानासोबतच त्यांना सुरक्षित, सजग आणि जबाबदार नागरिक बनविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका वैशाली मोहुर्ले यांनी केले. कार्यशाळेला शिक्षकवर्ग व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें