देवरी तालुक्यात १५४ पैकी ११७ जल जीवन मिशनची कामे अपूर्णच! ३ वर्षांनंतरही ‘हर घर नल’ योजनेची प्रतीक्षा कायम

जिल्हात १०४७ पैकी ६०४ योजना अपूर्णच

देवरी: नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत सुरू करण्यात आलेली ‘जल जीवन मिशन’ योजना गोंदिया जिल्ह्यात पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील तब्बल १ हजार ४७ योजनांपैकी ६०४ पाणी पुरवठा योजना अद्याप अपूर्ण अवस्थेत पडून आहेत. प्रशासनाकडून कामे प्रगतिपथावर असल्याचे सांगण्यात येत असले, तरी प्रत्यक्ष जमिनीवर मात्र नागरिकांच्या पदरी निराशाच पडली आहे.

निधीचा अभाव आणि कंत्राटदारांची दिरंगाई जिल्ह्यातील सुमारे ९५४ गावांतील १४ लाख नागरिकांना नळाद्वारे शुद्ध पाणी देण्याचे स्वप्न दाखवण्यात आले होते. मात्र, योजनेला ३ वर्षांहून अधिक कालावधी लोटल्यानंतरही अनेक गावांमध्ये कामे अर्धवट आहेत. काही ठिकाणी निधीचा अभाव तर काही ठिकाणी कंत्राटदारांच्या मनमानी व दिरंगाईमुळे योजना रेंगाळल्या आहेत. रस्त्यांवर खोदलेले खड्डे व अर्धवट पाईपलाईनमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.

तालुकानिहाय अपूर्ण योजनांचा तपशील: देवरी १५४ पैकी ११७ अपूर्ण , गोंदिया ११८/८६ सडक अर्जुनी १२५/८६ तिरोडा १३३/८६ अर्जुनी मोरगाव १२९/६१ गोरेगाव १२०/५९ सालेकसा १३०/५८ आमगाव ९८/५१ एकूण-१,०४७/६०४ अपूर्ण

आरोग्य विभागाकडून साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी शुद्ध पाणी पिण्याचे आवाहन केले जात असताना, दुसरीकडे शासनाच्या उदासीनतेमुळे नागरिकांना दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. ही रखडलेली कामे कधी पूर्ण होणार आणि ग्रामस्थांची तहान कधी भागणार, असा संतप्त सवाल आता जिल्हावासी विचारत आहेत.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें