गोंदियात जिल्हात १०० अंगणवाड्यांना छतच नाही; झोपलेले जि.प. प्रशासन जागे होणार का?

गोंदिया : शासनाकडून एकीकडे ‘स्मार्ट’ आणि ‘मॉडेल’ अंगणवाड्यांच्या मोठ्या वल्गना केल्या जात असल्या तरी, गोंदिया जिल्ह्यात मात्र वास्तवाचे धिंडवडे निघाले आहेत. जिल्ह्यातील तब्बल १०० अंगणवाड्यांना हक्काची पक्की इमारतच नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. चिमुकल्यांना खाजगी जागेत किंवा मंदिरांच्या आश्रयाने शिक्षणाचे धडे गिरवावे लागत असून, जिल्हा परिषद प्रशासन अजूनही गाढ झोपेत आहे का, असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.

एकीकडे डिजिटल युगाच्या बाता मारल्या जात असताना, गोंदियातील तब्बल १ हजार १४ अंगणवाड्यांमध्ये साधी विजेची सुविधाही उपलब्ध नसल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. हक्काचे छत नसल्यामुळे या बालकांना समाजमंदिर अथवा मंदिराच्या सभागृहाचा आधार घ्यावा लागत आहे. त्यातच सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली असून, या तात्पुरत्या स्वरूपाच्या वर्गांमध्ये बालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

पावसामुळे मुलांच्या सुरक्षिततेचा आणि आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चिमुकल्यांसाठी सुरक्षित व योग्य शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे आणि मुलांच्या होत असलेल्या गैरसोयीमुळे पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कागदावरच्या ‘मॉडेल’ अंगणवाड्या प्रत्यक्षात कधी उतरणार आणि या चिमुकल्यांना हक्काचे छत कधी मिळणार, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें