कत्तलीसाठी गोवंशाची निर्दयतेने वाहतूक; गोंदिया गुन्हे शाखेकडून १३ जणांवर कारवाई, ४२ गोवंश जनावरांची सुटका

◾️दोन कंटेनरसह ५१.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त; सालेकसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

    गोंदिया: सालेकसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दलदलकूही परिसरातून दोन मोठ्या कंटेनरमधून कत्तलीसाठी गोवंशाची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा (LCB) गोंदियाच्या पथकाने धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ४२ गोवंशांची सुटका केली असून दोन कंटेनर, ४ मोबाईल आणि गोवंशासह एकूण ५१ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एकूण १३ आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

    कारवाईचा तपशील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध धंद्यांवर कारवाईसाठी हद्दीत गस्त घालत असताना, दलदलकूही मार्गाने दोन कंटेनरमधून गोवंश कत्तलीसाठी नेले जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने दलदलकूही ते धनेगाव मार्गावर नाकाबंदी लावली.

    काही वेळातच संशयित दोन कंटेनर येताना दिसले. पोलिसांनी दोन्ही वाहने थांबवून तपासणी केली असता एका कंटेनरमध्ये २५ आणि दुसऱ्या कंटेनरमध्ये १७ असे एकूण ४२ गोवंश अत्यंत दाटीवाटीने व क्रूरतेने बांधून ठेवल्याचे आढळले. पोलिसांनी तात्काळ सर्व जनावरांची सुटका केली.

    जप्त करण्यात आलेला मुद्देमाल

    • गोवंश जनावरे (४२ नग): अंदाजे किंमत रु. ६,३०,०००/-
    • दोन कंटेनर ट्रक: अंदाजे किंमत रु. ४५,००,०००/-
    • अँड्रॉइड मोबाईल (४ नग): किंमत रु. ५७,०००/-
    • एकूण जप्त मुद्देमाल: रु. ५१,८७,०००/-

    तपासातील खुलासे व आरोपींची नावे चालकांची चौकशी केली असता, हे गोवंश ‘सैफर भाई’ याने दलदलकूही परिसरातून खरेदी केले होते आणि ते नागपुरातील कामठी व सिताबर्डी येथील व्यापाऱ्यांना कत्तलीसाठी पोहोचवले जाणार होते, अशी माहिती समोर आली. कंटेनरच्या आत जनावरे लपवण्यासाठी व कोंबण्यासाठी विशेष फेरबदल (आडवी लोखंडी पाटी व गुप्त दरवाजे) करण्यात आले होते.

    या प्रकरणी खालील १३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत:

    • खरेदीदार/दलाल: १) सैफर भाई, २) मुंजबिल कुरैशी (कामठी), ३) फैजुल हसन (सिताबर्डी, नागपूर)
    • कंटेनर मालक: ४) जावेद अहमद मो. मुस्तफा (उप्पलवाडी, नागपूर), ५) हरीलाल ब्रिजभानसिंग (लावा वाडी, नागपूर)
    • चालक व मदतगार (लेबर): ६) इद्रिश कलुवा कुरैशी (मूळ रा. आग्रा, ह.मु. नागपूर), ७) अब्दुल रहमान असलम (नागपूर), ८) फैजल अन्सारी (नागपूर), ९) अन्वर शब्बीर अली (कामठी), १०) रोहीत राजु डेहरे (नागपूर), ११) गुलाम रसूल मो. आलेनबी (नागपूर), १२) रिताबाई मोहबे (कुंभारटोली, आमगाव) व १३) रिताबाई मोहबे यांचे पती.

    सर्व आरोपींविरुद्ध प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध कायदा १९६० चे कलम ११(१) सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५(अ), ५(ब), ९ व ११ अन्वये सालेकसा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

    कारवाई पथक सदर धडक कामगिरी पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या निर्देशानुसार आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनात सपोनि अभिषेक जंगमवार, पोलीस अंमलदार तुलसीदास लुटे, राजकुमार खोटेले, दुर्गेश तिवारी, प्रकाश गायधने, सुनील डहाके, हंसराज भांडारकर, निलेश ठाकरे व राम खंदारे यांनी पार पाडली.

    Share

    👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

    और पढ़ें