देवरी तालुक्यातील ११ जिल्हा परिषद शाळांमधील हजारो बालिकांचे कन्यापूजन; ‘विश्व मांगल्य सभा’चा कौतुकास्पद व प्रेरणादायी उपक्रम!

देवरी: संस्कार, सामर्थ्य, सदाचार आणि सेवा यांसारख्या उच्च मूल्यांची बीजे बालमनात रुजविण्याच्या उद्देशाने नवरात्रीच्या पवित्र पर्वावर ‘विश्व मांगल्य सभा’ गोंदिया जिल्ह्याच्या वतीने एका अत्यंत नाविन्यपूर्ण व स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विश्व मांगल्य सभेच्या पूर्व विदर्भ संयोजिका तथा जिल्हा परिषद सदस्या सविता पुराम यांच्या पुढाकाराने देवरी तालुक्यातील एकूण ११ जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रत्यक्ष जाऊन हजारो शाळकरी बालिकांचे औक्षण करण्यात आले आणि मोठ्या उत्साहात कन्यापूजन सोहळा संपन्न झाला.

ग्रामीण भागात आनंद आणि उत्साहाचे वातावरण: आतापर्यंत शहरांपुरता किंवा मोजक्या मोठ्या कार्यक्रमांपुरता मर्यादित असलेला कन्यापूजनाचा हा आनंददायी उत्सव यावेळी थेट ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबांतील जिल्हा परिषदेच्या विद्यार्थिनींपर्यंत पोहोचला आहे. देवरी तालुक्यातील शिलापूर, फुक्कीमेटा, पुराडा, मुरपार, लोहारा, सावली, डोंगरगाव, ओवारा, पाऊलदोना, देवाटोला आणि चारभाटा या शाळांमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचा भव्य उपक्रम राबविण्यात आल्याने चिमुकल्या विद्यार्थिनी, शिक्षक-शिक्षिका आणि स्थानिक ग्रामस्थांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

पाच हजार बालिकांच्या पूजनाचा संकल्प: या संपूर्ण नवरात्रोत्सवाच्या काळात गोंदिया जिल्ह्यातील जवळपास ५,००० शाळकरी बालिकांचे कन्यापूजन करण्याचा व्यापक संकल्प विश्व मांगल्य सभेने केला आहे. जिल्हा परिषद सदस्या सविता पुराम स्वतः प्रत्येक शाळेत जाऊन विद्यार्थिनींशी संवाद साधत असून त्यांना संस्कारांचे मोलाचे धडे देत आहेत.

या विशेष मोहिमेअंतर्गत देवरी तालुक्यात आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये जिल्हा परिषद सदस्या कल्पनाताई वालोदे, पंचायत समिती सदस्या ममता अंबादे, महामंत्री प्रभाताई सलामे यांच्यासह परिसरातील अनेक महिला, शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामस्थांकडून भरभरून कौतुक: ग्रामीण भागातील बालिकांचा आत्मविश्वास वाढवणाऱ्या आणि त्यांच्यामध्ये भारतीय संस्कृतीची मूल्ये रुजविणाऱ्या या संवेदनशील उपक्रमाबद्दल ग्रामस्थ व शिक्षकांनी विश्व मांगल्य सभा आणि सविता पुराम यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें