देवरीच्या उपविभागीय पोलीस अधिकारीपदी राजेश तटकरे रुजू

🔺पत्रकारांच्यावतीने स्वागत, नक्षलविरोधी मोहिम आणि शैक्षणिक कार्याची आठवण

देवरी : राजेश तटकरे यांनी देवरीच्या उपविभागीय पोलीस अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारला. यानिमित्ताने ९ ऑक्टोबर रोजी देवरी येथील युवा पत्रकार संघाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.यावळी त्यांच्या नक्षलविरोधी मोहिमा आणि सामाजिक उपक्रमांची यावेळी आठवण करण्यात आली.

राजेश तटकरे यांनी २०१६ मध्ये नक्षल सेलची जबाबदारी सांभाळत असतांना परसोडी-धमदीटोला जंगल परिसरातील नक्षल विरोधी कारवाईत ७५० राऊंड. तसेच मिसपिरी-इस्तारी जंगल परिसरातून स्फोटके व ब्लास्टिंग साहित्य जप्ती केली होती.गोंदिया-गडचिरोली सीमावर्ती जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी लपवलेल्या शहीद मनोज बिंजाडे यांची मोटारसायकल जप्त करण्याच्या मोहिमेतही त्यांचा पुढाकार होता.

२०१६ ते २०१८ या कालावधीत तटकरे यांनी देवरी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक पदाची जबाबदारी पार पाडली होती. या पोलीस सेवेसोबतच त्यांनी आदिवासी युवकांसाठी भरतीपूर्व प्रशिक्षण, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि गणेशोत्सवाच्या काळात गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप असे विविध उपक्रम राबवले.

तटकरे यांनी आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्या माध्यमातून सार्वजनिक वाचनालयासाठी पाच लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक वाचनालयातून अनेक विद्यार्थ्यांना शासकीय नोकरी मिळवण्यासाठी लाभ झाला.

देवरी परिसरातील विविध शासकीय विभागांशी आणि समाजातील नागरिकांशी समन्वय राखत त्यांनी आपल्या कार्यकाळात अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवले होते. त्यांचे विविध कार्याची आठवण करण्यात आली.या प्रसंगी पत्रकार सुरेशकुमार लाडे, प्रमोद मोहबिया, डॉ. सुजित टेटे आणि अर्शद शेख उपस्थित होते. उपस्थितांनी राजेश तटकरे यांचा स्वागत करून त्यांना नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें