गोंदिया | प्रतिनिधी
स्मार्ट वीज मीटरला नागरिकांकडून विरोध होत असतानाही महावितरणकडून गोंदिया जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरूच आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १,१०,१२३ स्मार्ट मीटर बसविण्यात आले असून, उर्वरित मीटर बसविण्याचे कामही वेगाने सुरू आहे.
गोंदिया तालुक्यात सर्वाधिक ५७,६०० स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. तर सर्वात कमी १३,५४६ मीटर सडक-अर्जुनी तालुक्यात बसविण्यात आले आहेत. जिल्ह्यात एकूण ३.०८ लाख स्मार्ट मीटर बसविण्याचे उद्दिष्ट महावितरणने ठेवले आहे.
स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीजबिल, प्रीपेड प्रणाली आणि ग्राहकांवरील आर्थिक भार वाढेल, अशी भीती व्यक्त करत अनेक ठिकाणी नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. मात्र महावितरणकडून जुन्या मीटरच्या जागी टप्प्याटप्प्याने स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम सुरूच आहे.
महावितरणच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या वीजग्राहकांचा या योजनेत समावेश असून भविष्यात सर्व जुन्या मीटरऐवजी स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहेत.








