महामार्गावर काम करणाऱ्या मजुराचा भरधाव ट्रकने घेतला बळी!

सडक अर्जुनी : मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर भरधाव ट्रकने महामार्गावर काम करणाऱ्या मजुराला जोरदार धडक दिल्याने त्याचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे दोन मुलांच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरपले असून ब्राम्हणी खडकी गावावर शोककळा पसरली आहे.

मृतकाचे नाव डूडेश्वर धनलाल चूटे (वय ३६ वर्षे), रा. ब्राम्हणी खडकी, असे आहे. ते RRM कंपनीअंतर्गत महामार्गावर ग्रास कटिंगचे काम करीत होते. नेहमीप्रमाणे सकाळी ८ वाजता कामावर गेलेले डूडेश्वर चूटे दुपारी सुमारे ४ वाजताच्या दरम्यान महामार्गावर सेफ्टी बॅरिकेड लावण्याचे काम करीत होते.

याचवेळी नागपूरच्या दिशेने रायपूरकडे केळी भरून जाणाऱ्या JH 02 BW 5111 क्रमांकाच्या भरधाव ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच डुग्गीपार पोलीस स्टेशनचे कर्मचारी, महामार्ग पोलीस व हायवे पेट्रोलिंग पथक घटनास्थळी दाखल झाले. RRM कंपनीच्या वाहनाने मृतदेह ग्रामीण रुग्णालय, सडक अर्जुनी येथे नेण्यात आला.

या प्रकरणी ट्रकचालक जितेंद्र कुमार दास (वय २७ वर्षे, रा. झारखंड) याला पोलिसांनी अटक केली असून ट्रक डुग्गीपार पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आला आहे. पुढील तपास डुग्गीपार पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार विजय कोटांगले करीत आहेत.

महामार्गावरील मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

महामार्गावर काम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षेसाठी योग्य बॅरिकेडिंग, वाहतूक नियंत्रण आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना केल्या जातात का, असा गंभीर प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाला आहे. महामार्गावर काम करणाऱ्या मजुरांच्या जीविताची जबाबदारी नेमकी कोणाची, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

दोन मुलांचा आधार हिरावला गेल्याने एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें