दहा दिवसांपासून शाखा व्यवस्थापक नसल्याने ग्राहकांची कोंडी; शेतकरी, बचत गट व व्यावसायिकांची कामे ठप्प
देवरी: येथील भारतीय स्टेट बँकेच्या (एसबीआय) शाखेत गेल्या दहा दिवसांपासून शाखा व्यवस्थापक नसल्यामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. तालुक्यातील सर्वाधिक व्यवहार होणाऱ्या या शाखेत महत्त्वाची बँकिंग कामे रखडल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सध्या खरीप हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांना कृषी कर्ज मंजुरी, कर्ज नूतनीकरण व इतर बँकिंग प्रक्रियांसाठी वारंवार बँकेच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. मात्र शाखा व्यवस्थापक उपलब्ध नसल्याने अनेक प्रस्ताव प्रलंबित असून शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन विस्कळीत झाले आहे.
महिला बचत गट, स्वयंरोजगार करणारे युवक, लघु उद्योजक तसेच विविध शासकीय योजनांचे लाभार्थी यांनाही आवश्यक मंजुरी, स्वाक्षऱ्या आणि प्रशासकीय प्रक्रियेसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
देवरी तालुक्यातील प्रमुख आणि सर्वाधिक व्यवहार असलेल्या एसबीआय शाखेत इतके दिवस व्यवस्थापक नसणे ही गंभीर बाब असल्याची भावना ग्राहकांनी व्यक्त केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने शाखेत नियमित व्यवस्थापकाची नियुक्ती करून प्रलंबित कामांचा निपटारा करावा, अशी जोरदार मागणी ग्राहक, शेतकरी व नागरिकांकडून होत आहे.








