देवरी: भारतीय जनता पार्टीच्या जनकल्याण शिबिर कार्यक्रमांतर्गत आमगाव-देवरी-सालेकसा विधानसभा क्षेत्रातील शिलापूर येथे मोफत महा आरोग्य रोगनिदान व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर आमदार संजय पुराम मित्र परिवार तसेच शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिलापूर येथे पार पडले.
शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. शिबिरात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून विविध आजारांची तपासणी करून घेतली. नेत्ररोग, हृदयरोग, किडनी, स्त्रीरोग, त्वचारोग, बालरोग, अस्थिरोग, कान-नाक-घसा, दंतरोग तसेच जनरल मेडिसिन अशा विविध विभागांतील तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन केले.
शिबिरामध्ये अनेक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. गरजू रुग्णांना औषधांचेही मोफत वितरण करण्यात आले. तसेच गंभीर आजार असलेल्या रुग्णांना पुढील उपचारांसाठी शालिनीताई मेघे हॉस्पिटल येथे संदर्भित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक कार्यकर्ते, ग्रामस्थ व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित नागरिकांनी अशा आरोग्यविषयक उपक्रमांचे स्वागत करत आयोजकांचे आभार मानले.
या प्रसंगी सविता संजय पुराम, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ व शेकडो नागरिक उपस्थित होते. शिबिरामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना तज्ज्ञ वैद्यकीय सेवा गावातच उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.







