देवरी : ब्लॉसम पब्लिक स्कूल, देवरी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य आणि निरोगी जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात योग प्रशिक्षिका वैशाली मोहुरले यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना विविध योगासने, प्राणायाम तसेच ध्यानधारणेचे मार्गदर्शन केले. सहभागी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी उत्साहाने योगाभ्यास करून योगाचे महत्त्व जाणून घेतले. दैनंदिन जीवनात योगाचा समावेश केल्याने होणारे शारीरिक व मानसिक फायदे याविषयीही त्यांनी माहिती दिली.
या कार्यक्रमाला शाळेचे प्राचार्य डॉ. सुजित एच. टेटे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी विद्यार्थ्यांना नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन करत निरोगी, संतुलित आणि शिस्तबद्ध जीवनासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमात शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन नलू टेंभरे यांनी केले, तर मोहसिना खान यांनी आभार प्रदर्शन करून योग प्रशिक्षिका, प्राचार्य, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.आरोग्य, आनंद आणि सकारात्मकतेचा संदेश देणाऱ्या या योग दिन कार्यक्रमाची सांगता सर्वांनी निरोगी जीवनशैलीचा संकल्प करून केली.







