फुलचूर येथील खून प्रकरणाचा १२ तासांत उलगडा; चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

गोंदिया, दि. २४ जून २०२६ : गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुलचूर परिसरात घडलेल्या खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या १२ तासांत उलगडा केला असून या प्रकरणात चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कारंजा येथील रहिवासी अनमोल वसंत रंगारी (वय ४०) हे २२ जून रोजी रात्री घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर ते घरी परतले नाहीत. २३ जून रोजी फुलचूरजवळील शेतात त्यांचा मृतदेह आढळून आला. डोक्यावर व चेहऱ्यावर गंभीर मारहाण झाल्याचे निदर्शनास आल्याने गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेची विशेष पथके तपासासाठी रवाना करण्यात आली. तपासादरम्यान मृतक अनमोल रंगारी यांच्याकडून त्यांच्या पत्नीला वारंवार शारीरिक व मानसिक त्रास दिला जात असल्याची माहिती समोर आली.

याच कारणातून पत्नीचा भाऊ निरज तुलसीकुमार बनसोड (वय २८) याने आपल्या मित्रांच्या मदतीने खून करण्याचा कट रचल्याचे उघड झाले. आरोपीने मध्यप्रदेशातील नैनपूर येथील रोहित ऊर्फ आयुष नहार बंशकार (वय १९) याला ५० हजार रुपयांची सुपारी दिली होती. त्यानंतर रोहित आणि त्याचे दोन साथीदार निशांत मंगल बंशकार (वय १९) व राहुल मिश्रा (वय ३२) यांनी अनमोल रंगारी यांना दारू पिण्याच्या बहाण्याने फुलचूर परिसरात नेऊन लोखंडी सब्बल ने मारहाण करून खून केल्याची कबुली दिली.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ कारवाई करत मध्यप्रदेशातील नैनपूर येथून सर्व आरोपींना ताब्यात घेतले. पुढील तपास गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.

या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें