एल.सी.बी. गोंदियाची धडाकेबाज कारवाई : १ टाटा ट्रकसह ३० टन तांदूळ हस्तगत, साथीदारांचा शोध सुरू
गोंदिया: रावणवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजा सावरी बस स्टॉपजवळ उभ्या असलेल्या तांदळाच्या ट्रकवर दरोडा टाकून ड्रायव्हरला बांधून ठेवणाऱ्या हायवे दरोडेखोरांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा (LCB) गोंदिया पथकाने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत कारवाई करत दरोड्याचा माल लपवणार्या मुख्य आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून १८,१३,६९९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी नवीन रामचंद मौर्या (वय ३५ वर्ष, रा. प्रयागराज, उ.प्र.) हे १४ जुलै २०२६ रोजी चाकघाट (मध्य प्रदेश) येथून ३० टन ७६५ किलो तांदूळ टाटा ट्रकमध्ये भरून सडक अर्जुनीकडे जाण्यास निघाले होते. १६ जुलैच्या मध्यरात्री १२:०० वाजेच्या सुमारास थकवा आल्याने त्यांनी सावरी बस स्टॉपवर ट्रक उभा केला. १७ जुलैच्या पहाटे ४:०० वाजता एका अनोळखी इसमाने पिण्याचे पाणी मागण्याच्या बहाण्याने ट्रकचा दरवाजा ठोठावला. ड्रायव्हरने पाणी देताच इतर ३ साथीदारांनी त्याला चाकूचा धाक दाखवून बेदम मारहाण केली आणि जवळच असलेल्या झाडाला बांधून ठेवले.
घटनेचा थरार: पाणी मागण्याच्या बहाण्याने केला हल्ला दरोडेखोरांनी ड्रायव्हरला झाडाला बांधून १० लाख रुपयांचा ट्रक व ८ लाख रुपयांचा तांदूळ असा एकूण १८ लाखांचा मुद्देमाल जबरदस्तीने पळवून नेला होता. रावणवाडी पोलिसांत अप.क्र. ३७१/२०२६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य ओळखून गोंदियाचे पोलीस अधीक्षक गोरख भामरे व अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांनी तात्काळ तपासाचे आदेश दिले. एल.सी.बी.चे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विशेष तपास पथके तयार करण्यात आली.
गुप्त माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कोहका येथील संजयकुमार राजकुमार दमाहे (वय २०) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान संजयने गुन्ह्याची कबुली दिली व लुटलेला तांदूळ हमालांच्या मदतीने भानपूर रोडवर ३ वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवल्याचे सांगितले.
जप्त मुद्देमालाचा तपशील (एकूण: ₹ १८,१३,६९९/-)
- टाटा ट्रक (१ नग): ₹ १०,००,०००/-
- तांदूळ साठा १ (११ टन ३२० किलो): ₹ ३,०६,४५०/-
- तांदूळ साठा २ (११ टन ४६० किलो): ₹ ३,०९,४२०/-
- तांदूळ साठा ३ (७ टन ३२७ किलो): ₹ १,९७,८२९/-
- एकूण तांदूळ जप्ती: ३० टन १०७ किलो
मुख्य आरोपी संजय दमाहे यास पुढील तपासासाठी रावणवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, दरोड्यातील इतर फरार साथीदारांचा पोलीस कसून शोध घेत आहेत.








