शेतकऱ्यांना लुटणारे कृषीकेंद्र रडारवर ! जादा दराने खत विक्री करणाऱ्या कृषी केंद्रावर गुन्हा दाखल

शासनाच्या नियमांची पायमल्ली; रावणवाडी पोलिसांत कारवाईने जिल्ह्यात खळबळ

गोंदिया : शासनाने निश्चित केलेल्या कमाल किरकोळ किंमतीपेक्षा अधिक दराने रासायनिक खताची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गोंदिया जिल्ह्यातील कामठा येथील एका कृषी केंद्र संचालकाविरुद्ध रावणवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कृषी विभागाच्या या कारवाईमुळे खत विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

माहितीनुसार, कामठा येथील विनायक फर्टिलायझर्स या कृषी केंद्रातून नवरगाव कला गावातील शेतकरी शैलेश सुदाम उके यांनी ‘मध्य भारत’ कंपनीचे रासायनिक खत खरेदी केले होते. संबंधित खताच्या पोत्यावर १५०० रुपये कमाल किरकोळ किंमत नमूद असताना कृषी केंद्राने त्यांच्याकडून १८०० रुपये वसूल केल्याचे तपासात आढळून आले. म्हणजेच छापील किमतीपेक्षा ३०० रुपये अधिक दराने खताची विक्री करण्यात आली.

शेतकऱ्याने खताची रक्कम यूपीआयद्वारे ऑनलाइन भरल्याचे पुरावे तपास पथकास सादर केले. विशेष म्हणजे, अतिरिक्त पैसे आकारूनही शेतकऱ्याला कोणतीही अधिकृत पावती देण्यात आली नसल्याचे निष्पन्न झाले. यामुळे फसवणुकीसह आर्थिक शोषण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

कृषी विभागाच्या तपासात ही बाब सिद्ध झाल्यानंतर खत नियंत्रण आदेश, १९८५ तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ मधील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे आढळले. त्यानुसार कृषी विभागाच्या तक्रारीवरून रावणवाडी पोलीस ठाण्यात संबंधित कृषी केंद्र चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

कृषी विभागाने खत विक्रेत्यांना शासनाने निश्चित केलेल्या किमतीनुसारच विक्री करण्याचा आणि प्रत्येक व्यवहाराची अधिकृत पावती देण्याचा इशारा दिला आहे. नियमांचे उल्लंघन करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.

– प्रहार टाईम्स

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें