वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार व महाआरोग्य सन्मान-२०२६ प्रदान
देवरी: महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत उत्कृष्ट आरोग्य सेवा प्रदान करणाऱ्या संस्थांना दिला जाणारा वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार व महाआरोग्य सन्मान-२०२६ हा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय पुरस्कार देवरी येथील ग्रामीण रुग्णालयास प्रदान करण्यात आला आहे.
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित भव्य राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला. आरोग्यमंत्री यांच्या संकल्पनेतून आयोजित या कार्यक्रमात राज्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आरोग्य संस्थांचा गौरव करण्यात आला.
देवरी ग्रामीण रुग्णालयाने बाह्यरुग्ण सेवा, आंतररुग्ण उपचार, शस्त्रक्रिया सेवा, प्रसूती सुविधा तसेच आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत प्रभावी आरोग्य सेवा राबवून ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या उत्कृष्ट कार्याची दखल घेत राज्य शासनाने रुग्णालयाची पुरस्कारासाठी निवड केली.
या यशामागे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गगन गुप्ता तसेच वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्य कर्मचारी व संपूर्ण स्टाफ यांचे सामूहिक योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे.
गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात कार्यरत असलेल्या देवरी ग्रामीण रुग्णालयाने मर्यादित साधनसामग्रीमध्येही उत्कृष्ट आरोग्य सेवा देत जिल्ह्याचे नाव राज्यस्तरावर उज्ज्वल केले आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर परिसरातून रुग्णालय प्रशासनावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.







