देवरी: मराठी राजभाषा दिनानिमित्त क्लासमेट्स इन्फोटेक व कंप्यूटर अकॅडमी लोहारा येथे ‘आय.टी.त मराठी, ऐटीत मराठी’ हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
मराठी भाषेचा डिजिटल क्षेत्रात अधिकाधिक वापर व्हावा तसेच विद्यार्थ्यांमध्ये मातृभाषेबद्दल अभिमान निर्माण व्हावा या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मराठी भाषेचे महत्त्व, माहिती तंत्रज्ञानामध्ये मराठीचा वाढता वापर तसेच दैनंदिन जीवनात मराठीचा सन्मान राखण्याबाबत सुरतोली माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी केंद्र संचालक वैशाली सुजित टेटे, प्रशिक्षक देविदास टेटे व कुणाल टेटे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा वापर संगणक शिक्षण, डिजिटल कामकाज व संवादामध्ये आत्मविश्वासाने करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मराठी भाषेबद्दल आपला अभिमान व्यक्त केला. तसेच सर्व विद्यार्थी व शिक्षकांपर्यंत मराठी राजभाषा दिनाचा संदेश पोहोचविण्यासाठी विशेष PPT सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषा जपण्याची व आधुनिक तंत्रज्ञानासोबत मराठीचा संगम साधण्याची प्रेरणा निर्माण झाली.







