दिनबंधु ग्रामीण विकास संस्था व मित्र परिवार देवरीचा स्तुत्य उपक्रम
देवरी :दुर्गम भागातील मुलांचे शैक्षणिक भविष्य उज्वल व्हावे,या उद्देशाने दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त मानल्या जाणाऱ्या पालांदूर पंचायत समिती क्षेत्रातील रोपा,सुकडी,ढोडरा,मगरडोह, रामगड, टेकरी, बाळापूर,चुंभली,पालांदूर येथील जि. प.प्राथमिक शाळेच्या बहुसंख्य विद्यार्थ्यांना दिनबंधू ग्रामीण विकास संस्था आणि मित्र परिवार, देवरी यांच्या वतीने दिनांक 5 फेब्रु.रोजी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या या भागातील मुलांच्या चेहऱ्यावर या मदतीमुळे हास्य उमटले आहे.
या सामाजिक उपक्रमासाठी सशस्त्र पोलीस दुरक्षेत्र मगरडोहचे पोलीस उपनिरीक्षक संतोष गुट्टे यांचे विशेष सहकार्य लाभले. दुर्गम भागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सोयी-सुविधांचा अभाव असल्याने, त्यांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी दिनबंधू ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष कुलदीप लांजेवार,पोलिस दुरक्षेत्र मगरडोह चे पोलिस उप निरीक्षक संतोष गुट्टे,राज्य राखीव पोलीस दलाचे पोलीस उपनिरीक्षक गायधने,सुकळी ग्रामपंचायतीचे सरपंच कामेश्वर कल्लो, सामाजिक कार्यकर्ते विलास शिंदे,यशवंत गुरनुले, संदीप महोबीया, कमलेश पालीवाल, शुभम वाडीभस्मे यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक हुंडरा,खोब्रागडे,शेख, गाढवे व शिक्षक वृंद उपस्थित होते.
दुर्गम भागात काम करताना केवळ कायदा आणि सुव्यवस्था न राखता सामाजिक बांधिलकी जपणे गरजेचे आहे, असे मत पोलीस उपनिरीक्षक संतोष गुट्टे यांनी व्यक्त केले. दिनबंधु ग्रामीण विकास संस्थेच्या या उपक्रमामुळे गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पेन आणि इतर आवश्यक शैक्षणिक साहित्य मिळाल्याने पालकांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मित्र परिवारातील सदस्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही राबवले जातील, असा विश्वास दिनबंधु ग्रामीण विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कुलदीप लांजेवार यांनी व्यक्त केला.








