
बांधकाम पूर्ण होऊनही फलक लावण्याचा विसर, ठेकेदारांची मलाईदार कामावर नजर
देवरी: सार्वजनिक बांधकाम विभाग , जिल्हा परिषद तसेच उपविभागातील करण्यात आलेल्या बांधकामाच्या ठिकाणी झालेल्या कामा संदर्भात माहिती फलक नसल्याने नेमक्या कोणत्या शासकीय योजनेतील बांधकाम आहे? किती निधी / किमतीचे आहे? कंत्राटदार कोण आहे ? हे सर्वसामान्य जनतेला कळत नाही. हीकामे निकृष्ट दर्जाचे व भ्रष्टाचाराला वाव देत असल्याने फलक लावले नसल्याचा आरोप तालुक्यातील ग्रामीण भागातील गावकऱ्यांकडून केला जात आहे.
जि. प. सार्वजनिक बांधकाम विभाग व पंचायत समिती अतंर्गत शासनाच्या विविध योजनेतून पायाभूत सुविधांसह विविध विकास कामे केली जाते. कामात पारदर्शकता असावी म्हणून कामाच्या तांत्रिक मान्यतेसह सामाजिक किंमत व यंत्रणेच्या नावासह माहिती फलक कामाच्या ठिकाणी लावले जाते. पण बांधकाम विभागामार्फत तालुक्यात बांधकाम विभागामार्फत गावस्तरावर विशेषतः सिमेंट काँक्रीटचे नाली व रस्ता बांधकाम मोठ्या प्रमाणावर केले जाते. मात्र ज्या ठिकाणी नाली, रस्ते सुस्थितीत आहेत तेथे जुने बांधकाम जेसीबी मशीनच्या सहाय्याने पूर्णतः नष्ट करून दुरुस्तीच्या नावाखाली गरज नसताना नवीन बांधकाम करण्यात आले आहे. ग्रामपंचायत किंवा लोकप्रतिनिधींकडून प्रस्ताव सादर करण्यात आले आहे, त्या ठिकाणी खरच कामाची गरज आहे का याची शहानिशा न करतात अंदाजपत्रक तयार करून कामे केले जात आहेत.अनेक बांधकामे करून माहिती फलक न लावता बिलाची उचल करण्यात आली आहे. फलक लावले नसल्याने कामात अनियमितता होत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.