गोंदिया जिल्हात 54 टक्के पावसाची तूट, शेतकऱ्यांची चिंता वाढली

गोंदिया: जिल्हात पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत. रोहिणी, मृग नक्षत्र कोरडे गेले. अपेक्षा आद्र नक्षत्रावर होती. आद्रही निराशा करीत आहे. पावसाने अद्यापही जिल्ह्यात अपेक्षित हजेरी लावली नाही. आजही सरासरी पेक्षा 54 टक्के पावसाची तुट आहे. शेतकरी आभाळाकडे नजरा लावून आहेत.

जून महिन्यातील मृग नक्षत्रात पाऊस झाला तर शंभर टक्के पेरण्या होऊन उत्पादनही चांगले येते. मात्र गेल्या काही वर्षात मृग नक्षत्रात अपेक्षित पाऊसच बरसत नाही. पाऊस कधी लवकर तर कधी उशिरा येतो अन् पेरण्यांनंतर पावसाचा खंड पडतो. यंदाही जून संपत असताना दमदार पाऊस झालेला नाही. यावर्षी तरी मुबलक पाऊस होईल या आशेवर शेतकर्‍यांनी शेतजमिनी तयार केल्या. पावसाचे रोहिणी नक्षत्र पाठोपाठ मृग नक्षत्रही कोरडे गेलेे. यंदा मान्सूनपूर्व पावसानेही पाठ फिरवली. 1 ते 24 जून पर्यंतच्या पावसाच्या तालुकानिहाय टक्केवारीवर नजर टाकल्यास गोंदिया 42.3, आमगाव 32.3, तिरोडा 37, गोरेगाव 37, सालेकसा 48, देवरी 65.8, अर्जनी मोर 32.4 आणि सडक अर्जुनी तालुक्यात 29.3 टक्केच पावसाची नोंद झाली आहे. या कालावधीत 160.7 मिमी पाऊस होणे अपेक्षित असताना केवळ 73.7 मिमीच पाऊस झाला. ही टक्केवारी 45.9 एवढी आहे.

1.28 टक्केच पेरणी

गोंदिया जिल्ह्यात प्रामुख्याने धान, तूर, मका, तीळ, ऊस, कापूस, भाजीपाला, हळद, आले, पपई, केळी आदी पिकांची लागवड केली जाते. सर्वाधिक 180997 हेक्टर क्षेत्रात धानाची लागवड केली जाणार आहे. यासाठी 92241 हेक्टर क्षेत्रात धान नर्सरी टाकली आहे. 1067 हेक्टरमध्ये आवत्या पद्धतीने धान पेरणी झाली आहे. 20 हेक्टरमध्ये रोवणी झाली आहे. मका 80 हेक्टर, तूर 701 हेक्टर, तीळ 148.70 हेक्टर, सुरू ऊस 36.60 हेक्टर व खोडवा 107 हेक्टर, कापूस 3 हेक्टर, भाजीपाला 280.50 हेक्टर, हळद 310 हेक्टर, आले 22 हेक्टर, केळी, पपई 7.30 हेक्टर व इतर पीकांची 40 हेक्टर क्षेत्रात लागवड झाली आहे. पीक लागवड क्षेत्र 189037 हेक्टर असून 180997 हेक्टर क्षेत्रात धानाची लागवड होईल. आतापर्यंत 2410.80 हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे. याची टक्केवारी 1.28 आहे.

Share