गोंदिया जिल्हातील जलसाठ्यात घट, शिरपूर जलाशयात फक्त 18.74 टक्के पाणी

गोंदिया: पावसाळ्यात झालेल्या कमी पर्जन्यमानाचा फटका यंदा जलसाठ्यात जाणवत आहे. एप्रिल महिन्यातच पाण्याच्या पातळीवर परिणाम होऊ लागला असून जिल्ह्यातील धरण व तलावात गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कमी जलसाठा असल्याचे जलसंपदा विभागाकडून प्राप्त आकडेवारीवरून दिसून येत आहे.

तलावांचा जिल्हा म्हणून गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्यात बाघ-इंटियाडोह प्रकल्पांतर्गत इटियाडोह धरणासह बाघ प्रकल्पाचे पुजारीटोला, कालीसरार व सिरपूर या मोठ्या धरणासह बोदलकसा, चोरखमारा, चुलबंद, खैरबंदा, मानागड, रेंगेपार, संग्रामपूर, कटंगी व कलपाथरी असे 9 मध्यम प्रकल्प असून 23 लघु प्रकल्प व गोंदिया पाठबंधारे विभागाची 38 मामा तलाव आहेत. तर जिल्हा परिषदेच्या अख्त्यारीतील सुमारे दीड हजार जुने मामा तलाव आहेत.

दरम्यान, काही मोठ्या धरणाचे पाणी शेतीच्या सिंचनासाठी वापरले जात असले तरी बहुतांश मध्यम प्रकल्पातून जनतेला पिण्याच्या पाणी उपलब्ध करून देण्यात येते. दरम्यान, आजघडीला सर्व 9 मध्यम प्रकल्पांत सरासरी 44 टक्के इतकाच जलसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीपेक्षा यात 9 टक्क्यांनी घट झाली आहे. त्याचबरोबर लघू प्रकल्पांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास आज स्थितीत 34.272 दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. त्याची टक्केवारी 41.19 टक्के आहे. गेल्या वर्षी या लघू प्रकल्पांत 51.10 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. त्यात पाटबंधारे विभागाच्या 38 मामा तलावांत गेल्यावर्षी 62.58 टक्के जलसाठा असताना यंदा केवळ 31.83 टक्केच जलसाठा शिल्लक आहे. यावरून एप्रिल महिन्यातच जिल्ह्यातील धरण व तलाव तळ गाठत असल्याचे चित्र आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा जलाशयात पाण्याची घट आहे.

मोठ्या धरणात 3 टक्के घट

जिल्ह्यातील मोठ्या धरणाची स्थिती पाहता आजघडीला 51.16 टक्के जलसाठा शिल्लक आहे तर शिरपूर जलाशयात 18.74 टक्के, कालीसरार धरणात 38.13 टक्के तर इटियाडोह धरणात 39.21 टक्के इतका जलसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यात 3 टक्क्यांनी घट आहे.

Share