
2 लाख 20 हजारांची लाच घेतांना ‘तहसीलदार’ एसीबीच्या जाळ्यात ‘तलाठी’ फरार
चंद्रपूर : राज्यात लाचखोरीविरुद्ध लुचपतप्रतिबंधक विभागाने (एसीबी) जोरदार मोहीम उघडली असून, एकामागून एक अधिकारी जाळ्यात अडकत आहेत. परभणीतील महिला क्रीडा अधिकाऱ्याच्या अटकेनंतर आता चंद्रपूरच्या बल्लारपूर येथील तहसीलदार अभय गायकवाड यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या प्रकरणातील दुसरा आरोपी, तलाठी सचिन पुकळे, मात्र पसार झाला असून एसीबी त्याचा शोध घेत आहे.
या घटनेत, शेतकऱ्याने स्वतःच्या जमिनीतील माती आणि मुरूमाचे उत्खनन केले होते. हे उत्खनन अनधिकृत असल्याचे कारण पुढे करत तहसीलदार गायकवाड आणि तलाठी पुकळे यांनी शेतकऱ्याला ब्लॅकमेल करत 2 लाख 20 हजार रुपयांची मागणी केली. शेतकऱ्याने आधी 1 लाख 20 हजार रुपये दिले, पण उर्वरित 1 लाखासाठी लाचखोरांनी सतत तगादा लावला. अखेर वैतागलेल्या शेतकऱ्याने एसीबीकडे धाव घेतली. एसीबीने सापळा रचला आणि तहसीलदाराला लाच स्वीकारताना पकडले.
या कारवाईत तहसीलदार गायकवाड ताब्यात आला असून, त्याच्यासह तलाठी पुकळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. फरार तलाठ्याचा शोध आणि पुढील तपास एसीबीकडून सुरू आहे. लाचखोरीच्या या धक्कादायक प्रकरणाने पुन्हा एकदा महसूल खात्यातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे.