गोंदिया जिल्हात पावसाचा विक्रम, सायकलस्वार वाहून गेला..!

गोंदिया◼️दोन आठवडे उशिरा हजेरी लावलेल्या मोसमी पासवाने जून महिन्यातील सारेच विक्रम मोडले आहे. गत 24 तासांत जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली. पावसासाठी आसुसलेला शेतकरी सुखावला असला तरी पेरणीसाठी पावसाने उसंत देणे आवश्यक आहे. आज दुसर्‍या दिवसीही संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. नदी, नाले, तलावातील पाणी साठ्यात वाढ होत आहे. सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणाचे 2 वक्रदार 0.30 मीटरने उघडण्यात आले असून 1596 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदी, नाले व सखल भागातील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. या पावसाने प्रशासनाची मात्र पोल खोल केली.

सोमवारी सकाळपासून सुरू झालेला पाऊस आज मंगळवारीही सुरू होता. जिल्ह्यात जून महिन्यातील विक्रमी 107.8 मिमी पावसाची नोंद आज झाली. गोंदिया तालुका वगळता सातही तालुक्यात अतिवृष्टी झाली. गोंदिया तालुक्यात 57.6 मिमी पाऊस नोंदला गेला. आमगाव 106.1 मिमी, तिरोडा 73 मिमी, गोरेगाव 93.1 मिमी, सालेकसा 127.4 मिमी, अर्जुनी मोर तालुक्यात सर्वाधिक 153.6 मिमी पाऊस झाला. देवरी 149 मिमी, सडक अर्जुनी तालुक्यात 124 मिमी पाऊस नोंदला गेला. दोन दिवसात झालेल्या पावसाने गत वर्षीची सरासरी ओलांडली आहे. मागील वर्षी याच कालावधीत 138.8 मिमी पाऊस बरसला होता. यंदा 1 ते 24 जून या कालावधीत केवळ 17 मिमी पावसाची नोंद होती. तीन दिवसात 130 मिमी पाऊस कोसळला. आजपर्यंत जिल्ह्यात 147.6 मिमी पाऊस झाला असून टक्केवारी 85.1 आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा आजपर्यंत 5 टक्के पाऊस अधिक बरसला.

सायकलस्वार वाहून गेला

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील पिपळगाव-अरततोंडी मार्गावरील नाला तसेच बोंडगावदेवी-खांबी मार्गावरील नाल्याच्या पुलावरुन 3 ते 4 फूट पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. दरम्यान सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास पिंपळगाव-अरततोंडी पुलावरुन जाणारा सायकलस्वार वाहून गेला. अद्याप त्याचा शोध लागला नाही. तलाठी, तहसीलदार व प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share