प्रचारासाठी उरले अवघे 24 तास!

देवरी : गोंदिया जिल्ह्यातील चारही विधानसभा निवडणूक मतदार संघात प्रचारात चांगलीच रंगत आली आहे. दिवसेंदवस राजकीय वातावरण तापत आहे. प्रचारासाठी आता 24 तासांचा अवधी उरला आहे. त्यामुळे उद्या सोमवारी उमेदवारांना सभा, रॅली आणि बैठकांचा धडाका सुरू राहणार आहे. निवडणुकीचा प्रचार 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास थांबवणार आहे.

जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. चार मतदारसंघात 64 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या उमेदवारांच्या प्रचाराला अधिकृतरित्या 4 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. सध्या गावभेटी, पदयात्रा, जाहीर सभा, रॅली, कॉर्नर बैठका आदींचा धडाका सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे विधानसभा निवडणुकीच्या जाहीर प्रचारासाठी मुदत ही मतदान संपायच्या 48 तासांपर्यंतच आहे. त्यानुसार जाहीर प्रचार 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता संपणार आहे.

त्यानंतर उमेदवार आणि राजकीय पक्षांना सभा, रॅली, बैठका घेता येणार नाहीत, असे जिल्हा निवडणूक विभागातील अधिकार्‍यांनी सांगितले. ईव्हीएम मशीनच्या सरमिसळीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील चार मतदारसंघात 1285 मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर मतदान घेण्यासाठी ईव्हीएम मशीन त्या त्या मतदारसंघात पोहोचविण्यात आल्या आहेत. सर्व मतदारसंघात गरजेपेक्षा 20 टक्के अधिक कंट्रोल युनीट आणि बॅलेट युनीट देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात 1541 कंट्रोल युनीट आणि एवढेच बॅलेट युनीट तसेच 1669 व्हीव्हीपॅट मशीन पुरविण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव मतदार संघात 19 उमेदवार किल्ला लढवित आहेत. तिरोडा मतदार संघात सर्वाधिक 21 उमेदवार, गोंदिया विधानसभा क्षेत्रात 15 उमेदवार आणि सर्वात कमी आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघात 9 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. चारही मतदारसंघातील 64 उमेदवारांच्या भाग्याचा फैसला जिल्ह्यातील 11 लाख 25 हजार 100 मतदार करणार आहेत. यामध्ये सर्वाधिक 5 लाख 71 हजार 405 महिला मतदार तर 5 लाख 53 हजार 685 पुरुष मतदार आहेत. येत्या बुधवारी पार पडणार्‍या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे.

माहिती व तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक…

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नागरिकांना निवडणूक विषयी माहिती घेण्याकरिता व निवडणूक विषयी तक्रार करण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनामार्फत हेल्पलाईन क्रमांक (टोल फ्री) 1950 व मोबाईल क्रमांक 8080453152 कार्यान्वित करण्यात आला आहे.

Share