पाण्याअभावी रब्बीचे गणित बिघडले; शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला

PraharTimes : मोटारपंप असूनही नियमित वीजपुरवठा होत नसल्याने रब्बी हंगामातील धान करपले तर काही शेतकऱ्यांनी पाण्याअभावी धानाचे नुकसान होत असल्याचे पाहून हिरवा धान कापणी करून संताप व्यक्त केला. जिल्हातील आमगाव सालेकसा, देवरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामानंतर रब्बी हंगामात धानाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. रब्बी हंगामातील रोवणी आटोपली असून, धानाला पाण्याची गरज आहे. रब्बीसाठी जलाशयाचे पाणी सोडले जात आहे. तर ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे ते कृषिपंपाद्वारे पाणी करून पीक घेतात. पण कृषिपंपाला अखंडित वीजपुरवठा होत नाही. त्यात कधी ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड, तर कधी कमी विद्युत दाबाने वीजपुरवठा होत असल्याने शेतीला सिंचन करणे कठीण या समस्येने या परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. मोटारपंपाला अखंडित वीजपुरवठा होत नसल्याने अनेक शेतकरी चिंतातुर असून, त्यांच्यावर हंगामाला मुकण्याची वेळ आली आहे.

मोटारपंपांना अखंडित वीजपुरवठा कधी
शेतकऱ्यांना सिंचनासाठी कृषिपंपाला अखंडित आठ तास वीजपुरवठा करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. लोकप्रतिनिधी त्यांना आश्वासन देत आहेत. पण अद्यापही चार तास विद्युत पुरवठा होत असल्याने शेतकरी अडचणीत आले असून, त्यांना विजेच्या समस्येमुळे तोंडचा घास हिरावण्याची चिंता सतावत आहे.

Share