जिल्ह्यातील २२६ ग्रामपंचायती ‘क्षयरोग’मुक्त

गोंदिया: केंद्र शासनाच्या क्षयरोगमुक्त धोरणाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या माध्यमातून टीबी मुक्त गाव या संकल्पनेतून टीबी मुक्त ग्रामपंचायत हे अभियान राबविण्यात येत आहे. यात ग्रामंपाचयतींमध्ये स्पर्धा निर्माण करून क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत पुरस्कार देण्याचे नियोजन आहे. दरम्यान, जिल्ह्यातील २२६ ग्रामपंचायतींनी उपक्रमांतर्गत स्पर्धेचे निकष पूर्ण केल्याने या सर्व ग्रापंचायतीचे जागतिक टीबी दिनाच्या निमित्ताने महात्मा गांधी यांची प्रतिमा व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले आहे.

केंद्र शासनाने २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त करण्याचे धोरण आखले आहे. आरोग्य विभागाच्या माध्यमातून वर्ष २०२३ पासुन जिल्ह्यात टीबी मुक्त गाव या संकल्पनेतून टीबी मुक्त ग्रामपंचायत अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतींना पहिल्या वर्षी टीबी मुक्त असल्यास कास्य तर सतत दोन वर्षासाठी रजत आणि सतत तीन वर्षापासुन टिबी मुक्त राहिल्यास सुवर्ण रंगाची महात्मा गांधींची प्रतिमा देण्यात येत आहे. यात जिल्ह्यातील २२६ ग्रामपंचायतींनी महत्त्वाचा टप्पा गाठल्याने २४ मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिनानिमीत्त येथील पोवार बिल्डींग येथे राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत या ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात आला. यात जिल्ह्यात सतत दोन वर्षापासुन टिबी मुक्त राहिलेल्या ४३ ग्रामपंचायतीना रजत व १८३ ग्रामपंचायतींना पहिल्या वर्षी टीबी मुक्त राहिल्याने कास्यरंगाची महात्मा गांधींची प्रतिमा व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

तालुकानिहाय क्षयरोग मुक्त गाव

अभियानात क्षयरोग मुक्त झालेल्या तालुकानिहाय ग्रामपंचायती पाहता गोंदिया तालुक्यातील ४१ ग्रामपंचायती टीबी मुक्त झाल्या असून सडक अर्जुनी तालुक्यातील ३०, मोरगाव अर्जुनी २३, तिरोडा ४४, आमगाव २२, गोरेगाव २४, सालेकसा १५ व देवरी तालुक्यातील २७ ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

Share